नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांचे चेम्बर्स तुंबल्याने स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना सहन करावा लागत आहे. हे चेम्बर्स साफ न केल्यास ते दुर्गंधीचे पाणी बादलीत भरून नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयाच्या दालनात पसरविण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांना व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्यांचे चेम्बर्स नेहमीच चोकअप होत असतात. नेरूळ सेक्टर सहा परिसरातील मल:निस्सारण वाहिन्यांची वरचेवर नियमित साफसफाई होत नसल्याने चेम्बर्स चोकअप झाल्यास रस्त्यावरुन ये-जा करणांऱ्या रहीवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच हिमालय ही सिडकोच्या सोसायटी रस्त्यापासून काही प्रमाणात खोलगट भागात असल्याने चेम्बर्स चोकअप झाल्यास हिमालय सोसायटी आवारात असणाऱ्या मल:निस्सारणचे पाणी चेम्बर्समधून बाहेर पडते. हे पाणी गुडघाभर साचते. हिमालय सोसायटीतील रहिवाशांना हा नेहमीच त्रास सहन करावा लागत असून रहीवाशांच्या जिविताला यामुळे धोकाही निर्माण होण्याची भीती आहे. पालिका मल:निस्सारण वाहिन्यांचे चेम्बर्स नियमितपणे साफ करत नसल्याने स्थानिक रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मल:निस्सारण वाहिन्यांचा चोकअप काढण्यासाठी छोटी गाडी का मोठी गाडी वापरायची, हा पालिकेचा प्रश्न आहे. स्थानिक रहिवाशांना महापालिका मालमत्ता कर आकारते, पाणीपट्टी आकारते, मग सुविधा देण्यास हात आखडता का घेत आहे? मल:निस्सारणच्या चोकअपमुळे हिमालय सोसायटीसह परिसरातील रहिवाशांना नेहमीचा दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. रहिवाशांना या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने आपण याप्रकरणी तातडीने संबंधितांना चोकअप काढण्याचे निर्देश देवून स्थानिक रहिवाशांना दिलासा द्यावा, ही आपणास नम्र विनंती. याप्रकरणी लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास तेच ड्रेनेजमधून बाहेर येणारे पाणी घेऊन पाण्याची बादली पालिका प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची बक्षिसी म्हणून त्या बादलीतील पाणी नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात पसरविले जाईल की जेणेकरुन हिमालयच्या लोकांना होत असलेल्या त्रासाची व दुर्गंधीची आपणास कल्पना येईल, असे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.