बंड पडलेले पथदिवे, पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण, परिसराला बकालपणा
नवी मुंबई : सानपाडा परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण, साठलेला कचरा, बंद पडलेले पथदिवे या समस्येचच्या विळख्यातून सानपाडावासियांची मुक्तता करण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व भाजयुमाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कमालीचे वाढीस लागले आहे. या भागात मानखुर्द, गोवंडी या भागातून फेरीवाले व्यवसाय करत आहेत. या फेरीवाल्यांकडून त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या रहिवाशांना दमदाटी तसेच शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. रेल्वे स्टेशनपासून बाहेरच्या रस्त्यावर येईपर्यत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा अडथळा ओंलाडत तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविले जात नाही. त्यांच्यावर कारवाई करुन हा परिसर अतिक्रमणमुक्त केला जात नाही. या फेरीवाल्यांकडून स्थानिक पालिका अधिकाऱ्यांना दररोज आर्थिक मलिदा मिळत असल्यानेच या फेरीवाल्यांना , त्यांच्या अतिक्रमणाला व त्यातून निर्माण होणाऱ्या बकालपणाला पोसले जात आहे. या परिसरात असलेल्या गर्दीचा फायदा उचलत पाकिट मारणे, चैन स्नॅचिंग, तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने पळविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. इतकेच नाहीतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. फेरीवाले इतके निर्ढावले आहेत की, ते बिनधास्तपणे सांगतात की पालिकेत तक्रारी करा, कोणी आमचे वाकडे करणार नाही, आम्ही इथेच बसणार. या फेरीवाल्यांना तातडीने हटवून हा परिसर बकालपणातून मुक्त करण्यात यावा. एकही फेरीवाला बसणार नाही. याचे निर्देश द्या. जे या फेरीवाल्यांना वाचविण्यासाठी हफ्ते घेत असतील त्यांना समज द्या. पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गोवंडी-मानखुर्दच्या फेरीवाल्यांना अभय देण्याचे प्रकार आता थांबवा. सानपाडावासियांना रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर रस्त्यावर येईपर्यत अतिक्रमणाच्या अडथळ्याचा त्रास सहन करावा लागणार, परिसर स्वच्छ करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.
सानपाडा सेक्टर सातमध्येही सिताराम मास्तर उद्यानाच्यासभोवताली असलेल्या पदपथावरदेखील फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. या उद्यानाबाहेरील पदपथावरुन स्थानिक रहीवाशांना चालता येत नाही. फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय पूर्णपणे पदपथावर विस्तारला आहे. या पदपथावर ये-जा करण्यासाठी जागा नसल्याने स्थानिक रहिवाशांना रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे. त्यातून अपघातही घडले आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पडले आहेत. त्यांना दुखापतीही झाल्या आहेत. उद्यानाला बकालपणा आला आहे. उद्यानाला फेरीवाल्याच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी या ठिकाणीही सातत्याने फेरीवालाविरोधी अभियान राबवून उद्यानालगतचे पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यात यावे. सानपाडा सेक्टर आठमध्ये असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेर असलेल्या पदपथावर कचऱ्याचे डब्बे भरुन वाहत आहे. हा कचरा हटविला जात नसल्याना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचरा विखुरल्याने परिसराला बकालपणा आला. त्या ठिकाणच्या कचरावाहक ठेकेदारांना या परिसरातील दररोज कचरा उचलण्याचे निर्देश द्यावेत. सानपाडा सेक्टर आठमधील शिवशक्ती ते आदर्श सोसायटीदरम्यानचे पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे रहीवाशांना अंधारातच ये-जा करावी लागत आहे. या ठिकाणचे पथदिवे दुरुस्त करुन चालू करण्याचे संबंधितांना निर्देश देवून स्थानिक रहिवाशांची अंधाराच्या समस्येतून मुक्त करावे. सानपाडावासियांना आज विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. ते करदाते आहे. स्टेशनपासून परिसरापर्यत पदपथावरुन चालता येत नाही. फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. पथदिवे बंद असल्याने अंधाराची समस्या आहे. समस्या आपणाकडे सादर केल्या आहेत. लवकरात लवकर सानपाडावासियांची समस्येतून मुक्तता करुन त्यांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.