जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सारसोळे गाव येथील महापालिका शाळा क्रं १२ येथील मराठी प्राथमिक शाळा व सीबीएसई शाळा क्रं ९८ मध्ये नियमित व ग्रेडेबल मुख्याध्यापक तातडीने नियुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात सारसोळे गावची महापालिका शाळा व त्याच ठिकाणी चालविण्यात येणारी सीबीएसईची शाळा असुविधांमुळे व तेथील शैक्षणिक समस्यांमुळे गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरलेली आहे. शिक्षकांची कमतरता, मुख्याध्यापकांचा अभाव, शैक्षणिक साहित्य मिळण्यास होणारा विलंब, सुविधांचा अभाव यामुळे सारसोळेच्या महापालिका शाळेतील शाळा क्रं १२ मधील प्राथमिक शाळा व सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा क्रं ९८ कायमच चर्चेमध्ये असतात. सध्या या दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा अभाव असल्याने शालेय कामकाजात सूसूत्रतेचा व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.या दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापक तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे. शालेय कामकाजातील सूसूत्रतेसाठी दोन्ही शाळांमध्ये तातडीने मुख्याध्यापक नियुक्त करण्याचे संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.



