नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असलेला नेरूळ सेक्टर सहा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नशेंडींचा वावर वाढल्याने या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नशेडींकडून लुटमारीसाठी हल्ल्याचे प्रकार वाढू लागल्याने हा परिसर नशेडीमुक्त करण्याचे आव्हान नेरुळ पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
काही वर्षापूर्वी तुलसी भवन इमारतीची दुर्घटना झाली. या इमारतीच्या लोखंडी जाळ्या नशेडींनी काढून विकल्या. सिडकोच्या शिवम व सागरदिप सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपीमध्ये गेल्या दोन-अडीच वर्षापासून नशेडींनी ठिय्याच मांडलेला आहे. दत्तगुरु सोसायटीच्या टॉवरचे काम सुरु असलेल्या समोरील रस्त्यावर वाहनांमध्ये तसेच रस्त्यालगतच्या पदपथावर नशेडी रात्रीच्या वेळी खुलेआमपणे नशा करताना पहावयास मिळतात. महापालिकेच्या राजमाता जिजाऊ उद्यानातही नशेडींचा रात्रीच्या वेळी वावर असतो. काही दिवसापूर्वी उद्यानाच्या एका कोपऱ्यावर असलेल्या सार्वजनिक शौचालयात रिक्षाचालक लघुशंकेसाठी गेला असताना त्याच्याकडील पैसे व मोबाईल लुटण्यात आला. तो आरडाओरडा करणार हे पाहून त्याच्या छाती व खांद्याच्या मध्ये नशेडींनी वार करुन त्याला जखमी केले. काही दिवसापूर्वी नशेडींनी सेक्टर सहामधील एका पानटपरीवाल्याला बेदम मारहाण केली होती. महावितरणच्या विद्युत डीपीची दुरावस्था झाली असून प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीही तुटल्या आहे. आतील लोखंडी गेट तुटले असून गेटच्या बाजूकडील भितींना तडे गेले आहेत. या ठिकाणी बसणाऱ्या नशेडींनी दोन-अडीच महिन्यापासून तेथील पदपथावरुन ये-जा करणाऱ्यांची लुटमार करण्यास सुरुवात केली. लहान मुलांकडून पैसे व मोबाईल हिसकावून घेणे, लहान मुलांना मारहाण करणे अशा घटना नशेडींकडून घडतच असतात. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या १० वाजता शिवालिक अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या झेरॉक्स दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी आलेल्या आठवीच्या एका मुलाचा मोबाईल चोरण्यासाठी त्याचे अपहरण करण्याचाही प्रयत्न या नशेडींनी केला आहे. रात्रीच्या वेळी महावितरणच्या विद्युत डीपीपासून, दत्तगुरु टॉवरचे काम सुरु असलेल्या ठिकाणच्या रस्त्यावर तसेच पालिकेच्या उद्यान हा परिसर गेल्या काही महिन्यांपासून नशेडींचे माहेरघर बनले आहे. लुटमारीच्या घटना घडत असतानाही नशेडींच्या भीतीने कोणी तक्रार करत नसल्याने आजवर नशेडींचे फावले आहे.
मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेची नेरूळ पोलिसांकडून तात्काळ दखल घेत महावितरणच्या विद्युत डीपी परिसरात दिवसा व रात्री गस्त वाढविली आहे. नेरूळ पोलिसांनी रात्रीच्या वेळी अकरानंतर पहाटेपर्यत पालिकेच्या उद्यानात व दत्तगुरु टॉवरसमोरील रस्त्यावर व पदपथावर गस्त वाढविल्यास हा परिसर नशेडींच्या विळख्यातून मुक्त होईल, असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
नशेडींकडून लुटमारीच्या घटना घडत असतानाही घटना घडताच संबंधितांकडून ११२ या क्रमाकांवर संपर्क साधला जात नाही. तसेच स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार केली जात नसल्याने नशेडींचा वावर पोलिस रेकॉर्डवर आजतागायत आलेला नाही. काही घटना घडल्यास ११२ क्रमाकांवर संपर्क साधण्याचे नेरूळ पोलिसांकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर सहामध्ये नशेडींचा उपद्रव वाढत चालल्याने या परिसर नशेडीमुक्त करण्याचे आवाहन नेरूळ पोलिसांपुढे निर्माण झाले असून जनतेनेही त्यांना संपर्क करणे, तक्रारी करणे, घटना घडताच ११२ क्रमाकांवर सूचना देणे आवश्यक आहे. याप्रकरणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करताच त्यांनी याप्रकरणाची गंभीरपणे दखल घेत याप्रकरणी गृहविभागाचे डॉ. आय. एस. चहल यांच्याकडे चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.


