नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात लहान मुलांचे पैसे लुटणे, मोबाईल चोरणे हे करणाऱ्या नशेडींकडून मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने स्थानिक नेरूळ पोलीसांना तातडीने या नशेडींचा बंदोबस्त करण्याचे निर्देश देण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमधील प्लॉट १५ वरील शिवम सोसायटी व सागरदीप सोसायटीच्या मध्यभागी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची विद्युत उपकेंद्र (डीपी) आहे. या उपकेंद्रात गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांचे २४ तास व्यसन करणाऱ्या नशेडींनी ठिय्या मांडलेला आहे. याबाबत गस्तीवर येणाऱ्या पोलिसांना व एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांकडे स्थानिकांनी अनेकदा तक्रारी करुनही नशेडींवर कारवाई करण्यास त्यांनी आजतागायत टाळाटाळ केलेली आहे. या नशेडींकडून विद्युत उपकेंद्रात रात्रीच्या वेळी गोंधळ चालू असतो. या प्रकारामुळे सभोवतालचे रहिवाशी त्रस्त झाले असून स्थानिक पोलीस व महावितरणचे कर्मचारी यांच्याकडून याप्रकरणी नशेडींच्या भीतीमुळे सर्वजण निमूटपणे त्रास सहन करत आहेत. नशेडींकडून या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या लहान मुलांना लुटण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढीस लागले आहेत. लहान मुलांकडून पैसे लुटणे, त्यांचे मोबाईल चोरणे असे प्रकारही घडले आहेत. मंगळवार, दि. २९ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता परिसरातील वरुणा सोसायटीतील इयत्ता आठवीतील मुलगा विद्युत उपकेंद्राशेजारील शिवम सोसायटीतील आपल्या मावशीकडे जात असताना दोघा नशेडींनी त्याला अडविले. बिडी आहे का, पैसे आहेत का असे विचारत त्या मुलाला जबरदस्तीने सोबत असलेल्या दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाने त्यांच्या हाताला हिसका देत शिवम सोसायटीतील आपल्या मावशीच्या घरी पलायन केले. यादरम्यान तेथे फळ विकणाऱ्या मुलाने पळत येवून त्या मुलाची सुटका केली. काही लोकांनी आरडाओरड केल्याने त्या नशेडींनी पलायन केले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा उपकेंद्राची मी कामावरुन आल्यावर पाहणी केली असता महावितरणच्या आवारातच गेटजवळ तसेच मोकळ्या जागेत नशेडींचा वावर पहावयास मिळाला. लुटमार करता करता मुलांचे अपहरण करण्याचे नशेडींचे धाडस वाढले आहे. नशेडींकडून आजवर स्थानिक पोलिसांनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कानाडोळा केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज अपहरण , उद्या मुडदे पाडण्यासही नशेडी मागेपुढे पाहणार नाहीत. समस्येचे गांभीर्य पाहता आपण नशेडींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचे व दिवसा तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी गस्त घालण्याचे नवी मुंबई पोलिस आयुक्तांलयातील नेरूळ पोलिसांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.



