सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : २८ जुलै हा दिवस विश्वभरात ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे व पर्यावरणविषयक जागरुकता वृध्दींगत करणे या उद्दिष्ठांची
पूर्तता केली जाते. म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानांतर्गत जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून आठही विभाग कार्यालयीन क्षेत्रात सार्वजनिक स्थळांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व श्रीम. स्मिता काळे आणि परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ उपआयुक्त संजय शिंदे यांच्या निरीक्षणाखाली सर्व विभागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या.
यामध्ये बेलापूर विभागात सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर १४ दिवाळेगाव जेट्टी याठिकाणी खाडी किनाऱ्यावर व खारफुटी परिसरातील प्लास्टिक, कागद व इतर कचरा संकलित करुन परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये स्थानिक रहिवाशांप्रमाणेच बेलापूर येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व विद्या उत्कर्ष मंडळ कॉलेज आणि रामशेठ ठाकूर कॉलेज खारघर येथील एनएसएस युनिटचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
नेरुळ विभागातही नेरुळ सेक्टर ६ पाम शेजारी सर्व्हिस रोड व त्याला लागून असलेला वजिरानी स्पोर्ट्सपर्यंतचा ग्रीन बेल्ट याठिकाणी सखोल स्वच्छता करण्यात आली. नेरुळ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या नियंत्रणाखाली नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
वाशी विभागातही सहा.आयुक्त सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ यांच्या माध्यमातून सेक्टर ८ येथील सागर विहार जेट्टी तसेच सेक्टर १० येथील मिनी सिशोअर होल्डींग पॉण्ड या दोन ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. यामध्ये रहिवाशांप्रमाणेच केबीपी कॉलेज वाशी, फादर ॲग्नेल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी व फादर ॲग्नेल स्कूल ऑफ लॉ येथील एनएसएस विद्यार्थी सहभागी झाले होते.
तुर्भे विभागात सानपाडा स्टेशनचा परिसर आणि सेक्टर १० जूईनगर येथील ट्रीबेल्ट याठिकाणच्या स्वच्छता मोहीमा सहा.आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली यशस्वीपणे राबविण्यात आल्या. यामध्ये एसआयईएस कॉलेज, स्टर्लींग कॉलेज, एसीपाटील कॉलेज, ओरिएंटल कॉलेज येथील एनएसएसचे विद्यार्थी मोठया संख्येने सक्रीय सहभागी झाले होते.
कोपरखैरणे विभागातही सहा.आयुक्त भरत धांडै व स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरात राबविण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत राफनाईक महाविद्यालय, टिळक कॉलेज, ज्ञानविकास महाविद्यालय येथील एनएसएस युनिटच्या विद्यार्थ्यांनी उत्फुर्तपणे सहभाग घेतला व परिसर स्वच्छ केले.
घणसोली रेल्वे स्टेशन परिसरातील सखोल स्वच्छता मोहीमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या परिमंडळ २ उपआयुक्त स्मिता काळे सहभागी झाल्या होत्या. सहा.आयुक्त उत्तम खरात व स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या नियोजनानुसार संपन्न झालेल्या या मोहीमेत नागरिकांसोबतच टिळक कॉलेज, जे के कॉलेज व इंदिरा गांधी कॉलेज येथील एनएसएस विद्यार्थीही उत्साहाने सहभागी झाले होते.
ऐरोली सेक्टर २० येथील खाडी किनाऱ्यावर राबविण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत मेहता कॉलेज सेक्टर २० येथील एनएसएस विद्यार्थी यांनी सहा.आयुक्त सुनिल काठोळे व मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली नमुंमपा अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मींसह एकत्र येत नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम पार पाडली.
दिघा विभागात दिघा रेल्वे स्टेशन परिसर व पटणी मैदान परिसर याठिकाणी एसडीव्ही कॉलेजच्या एनएसएस युनिट मधील विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवली.
या स्वच्छता मोहीमेत प्राधान्याने प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स, प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिक, कापड, कागद अशा स्वरुपाचा कचरा संकलीत करण्यात आला. व गोण्यांमध्ये भरुन महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. यावेळी स्वच्छता मोहीम झाल्यानंतर कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देत स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली. स्वच्छता व आरोग्य याचा परस्पर संबध लक्षात घेऊन जागतिक निसर्ग संवर्धन दिन पर्यावरणपूरक उपक्रमांतून उत्साहाने साजरा करण्यात आला. यामध्ये एनएसएस युनिटच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत युवकांच्या मनात असलेली पर्यावरणविषयक जबाबदारी अधोरेखीत केली.



