नवी मुंबई : घणसोलीतील नागरी समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेतर्फे महापालिकेच्या घणसोली विभाग अधिकारी कार्यालयावर ‘थाळी नाद’ मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर रबाले पोलिस स्टेशनकडून मनसेचे पदाधिकारी संदीप गलुगडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. हक्कासाठी, सुविधांसाठी मोर्चा निघत असताना पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसवर मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आपला संताप व्यक्त करत थेट पोलिसांनाच अवैध धंदे, अनधिकृत डान्स बारवर कारवाई करण्याचे धाडस दाखविण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी नोटीस बजावली तरी मोर्चा निघणारच असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
घणसोली मध्ये विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. खराब रस्ते-पदपथ, मलेरिया डेंग्यू ची साथ, अतिक्रमणाचा विळखा, अपुरा आणि दूषित पाणी पुरवठा, उद्यानाची दूरवस्था, रस्त्यावर पडलेला घनकचरा, घणसोली मधून दुर्गंधी युक्त वाहणार मोठा नाला अशा विविध नागरी समस्यांनी घणसोली मध्ये थैमान घातले आहे. या समस्यांचा जाब विचारण्यासाठी बुधवारी मनसेतर्फे ‘थाळीनाद मोर्चा’चे आयोजन केले आहे. मनसे प्रवक्ते, शहर अध्यक्ष गजानन काळे स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे मनसेकडून प्रसिद्धी माध्यमांना कळविण्यात आले होते. हा मोर्चा काढण्यापूर्वीच रबाले पोलिसांकडून संदीप गलुगडेंना नोटीस बजावण्यात आल्याने मनसे वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.
महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयावर लोकशाही मार्गाने शांततेचे मोर्चे काढताना सुद्धा पोलिस नोटिसा देतात? मोर्चे, निदर्शने, आंदोलन करण्यास मनाई? बाकी नवी मुंबईत चालणारे अवैध कारनामे यावर आणि हो अनधिकृत डान्स बार यांच्यावर पण कारवाई करण्याचे धाडस दाखवा … लिस्ट लवकरच पुराव्यासह पोलिसांना देवू …असे एक्सवर गजानन काळे यांनी ट्विट केले आहे.



