नवी मुंबई : देशाच्या राजकारणात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी ‘व्होट चोरी’ प्रकरणी पुरावे सादर करत खळबळ उडवून दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ सेक्टर दोन परिसरात आयोजित करण्यात आलेली ‘मतांची चोरी’ ही अनोखी दहीहंडी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून फोडण्यात आली.
दहीहंडी उत्सव संपुर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देत दहीहंडीचे आयोजन केले आहे. सध्या गाजत असलेला मराठी भाषेचा मुद्दा त्याचबरोबर महायुती सरकारच्या मंत्र्यांचे कारनामे, वाढती महागाई, महायुती सरकारने पाडलेला मतांचा पाऊस अशा विविध मुद्द्यांवर दहीहंडी साजरी करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने करण्यात येत आहे. काँग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सचिव श्रीमती विद्या भांडेकरयांच्या नेतृत्वाखाली नेरुळ येथे काँग्रेस पक्षाने अनोखी ‘मतांची चोरी’अशी दहीहंडी फोडली. या प्रतीकात्मक आंदोलनाद्वारे काँग्रेसने आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला जागा दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा सचिव महानंद रामराजे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



