जीव मुठीत घेऊन वावरणाऱ्या रहिवाशांना खा. नारायण राणे यांचा दिलासा
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
मुंबई : काळबादेवी येथील स्वदेशी मार्केटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची परिस्थिती बिकट असून मृत्यूची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. महापालिका व म्हाडाने स्वदेशी मार्केट धोकादायक घोषित केले असल्याने लवकरात लवकर या मार्केटची पुनर्बांधणी होणे आवश्यक असून आपण त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी दिली.
स्वदेशी मार्केटमधील सदनिकाधारक व व्यापाऱ्यांनी केलेल्या आग्रही मागणीला प्रतिसाद देताना खासदार नारायण राणे यांनी बुधवारी सांयकाळी ५ वाजता या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी धर्मेश पंचोली, ध्रुवीन शहा, सुमन अगरवाल, मुकेश मोरे, चिराग शहा, मुर्गेश शहा, हेमंत शहा, गीताबेन शहा, ममता परमार यांनी खासदार नारायण राणे यांच्यासमोर माहिती कथन करताना तेथील समस्यांचा पाढा मांडला.
स्वदेशी मार्केट ही इमारत १२२ ते १२५ वर्षे जुनी असून दोन जुलै २०२३ रोजी सी १ महापालिका प्रशासनाने घोषित केलेली आहे. त्यापूर्वी सी २ घोषित केली होती. महापालिका व म्हाडाने ही बिल्डींग खाली करण्याचे तेथील स्थानिक रहिवाशांना व व्यापाऱ्यांना निर्देशही दिले होते. रहिवाशी इमारत पुनर्बांधणीस तयार असले तरी काही व्यापाऱ्यांचा पुनर्बांधणीस विरोध आहे. तळमजल्यावर व्यापारी व वरच्या मजल्यांवर रहिवाशी असे चित्र आहे. तेथील रहिवाशांना शौचालयाचीही सुविधा उपलब्ध नाही, नागरी सुविधांसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. धोकादायक इमारतीत जीवाला धोका असतानाही अन्यत्र सोय नसल्याने रहीवाशी आला दिवस ढकलत आहेत. तेथील स्थानिक रहीवाशांनी आपल्या समस्या खासदार नारायण राणे यांच्यासमोर मांडल्या. रहिवाशांना दिलासा देताना खासदार नारायण राणे यांनी तेथील व्यापारी वर्गाशीही चर्चा केली.
इमारत पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरु असून चार बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्बांधणीस स्वारस्य दाखवित निविदाही भरल्या आहेत. सदनिकांमधील लोकांच्या जीवाला धोका असल्याने येथील पुनर्बांधणी लवकरात लवकर गरजेचे असल्याचे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त करताना येथील रहिवाशांना व व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले.



