जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांचे हित केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असलेल्या श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाची ४३ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे सर्वश्री संचालक मंडळ, सभासद बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत तसेच कारकान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कारखाना कार्यस्थळी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेची सुरुवात श्री विघ्नहर गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमेला वंदन करून तसेच कारखान्याचे संचालक स्व. पंकज वामन यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी कारखान्याच्या प्रगतीचा अहवाल सादर करून उपस्थित सभासदांसोबत संवाद साधला. सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नवतंत्रज्ञान, ऊस विकास योजना, आदी विषयांसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच अनेक सभासदांनी चर्चेत सहभाग घेऊन कारखान्याच्या प्रगतीबद्दल सकारात्मक विचार मांडून समाधान व्यक्त केले व उपस्थित सर्वांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देऊन संचालक मंडळावर नेहमीप्रमाणे विश्वास दाखविल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि पुढील काळातही सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वचनबद्ध राहत आपल्या सर्वांच्या सहकार्याने कारखान्याची कामगिरी अशीच उंचावत राहील असा विश्वास यानिमित्ताने दिला.
सध्या साखर कारखानदारीत अद्ययावत एआय तंत्रज्ञान आले आहे. त्यामुळे नव तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेती केली पाहिजे. त्याअनुषंगाने आपल्या कारखान्याची वाटचाल सुरू असून यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. सभेच्या दरम्यान मागील गळीत हंगामात एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या व पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच कारखान्याचे संस्थापक चेअरमन, मा. खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांना यावेळी पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी शेतकरी संघटनेचे सर्व नेते, पदाधिकारी, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, सभासद बंधू भगिनी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



