नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा डब्बे तातडीने वितरीत करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायटींना पालिका प्रशासनाने कचऱ्याचे डब्बे वितरीत करुन जवळपास नऊ वर्षांचा कालावधी लोटला आहे. यादरम्यान हे कचऱ्याचे डबे तुटले असून त्यातील कचरा गळत आहे. सोसायटी आवारात तसेच कचरा वाहक वाहनांजवळ हे कचरा डब्बे नेल्यास गळणाऱ्या कचऱ्यामुळे संबंधित ठिकाणी दुर्गंधीचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात कचरा डब्बे गृहनिर्माण सोसायटींना वितरीत करावे, यासाठी आयुक्त कार्यालयात व विभाग अधिकारी कार्यालयात असंख्य लेखी निवेदनेही सादर केली आहे. महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यापासून कचरा डब्बे गृहनिर्माण सोसायटींना वितरीत केले जात आहे. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असून सर्व लोकहितैषी निर्णय व कामे प्रशासनाच्या माध्यमातून होत असताना काही राजकीय घटक या कामांचे श्रेय घेण्याचा व स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. कामे व्हावीत यासाठी सर्वपक्षीय राजकीय घटक व सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात. पण निर्णय घेण्याचे व काम करण्याचे अधिकारी केवळ पालिका प्रशासनाला आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावातील अनेक गृहनिर्माण सोसायटींना कचरा डब्बे अजूनही मिळाले नसल्याने तुटक्या डब्यातच कचरा संकलनाचे काम केले जात आहे. समस्येचे गांभीर्य पाहता सारसोळे गाव व सेक्टर सहा परिसरातील गृहनिर्माण सोसायटींना कचरा डब्बे तातडीने वितरीत करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



