स्वयंम न्यूज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी विशेष अभियान राबविण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी व विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहराला स्वच्छतेचा इतिहास आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये या शहराला दोन वेळा प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळालेले आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई शहरांने अनेकदा प्रथम तीन क्रमाकांमध्ये पारितोषक मिळविलेले आहे. आज याच शहराला पूर्णपणे बकालपणाचा विळखा बसला आहे आणि यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, हे मला खेदाने नमूद करावे लागत आहे. आज शहरामध्ये दिघा ते बेलापूरदरम्यान हजारोंच्या संख्येने बाराही महिने अनधिकृत होर्डींग व बॅनर लागत आहेत. यामुळे पालिका प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून शहराला बकालपणा आला आहे. अनधिकृत होर्डींग व बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार असतानाही याविरोधात गुन्हे दाखल करण्यास महापालिका टाळाटाळ करत असून एकप्रकारे त्यांना खतपाणीच घालत आहे. शहरातील बाह्य व अंर्तगत रस्ते तसेच चौक, पथदिवे सर्वत्र अनधिकृत बॅनर व होर्डींग लागलेले आहेत. हे प्रकरण गंभीर असून अनधिकृत बॅनर व होर्डींग लावणाऱ्याणविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई करणे आवश्यक आहे. आपण याप्रकरणी विशेष अभियान राबवून शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



