नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानातील तुटलेल्या झोक्याची तातडीने दुरुस्ती करण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने बसविलेल्या खेळण्यापैकी दोन ठिकाणच्या झोक्यांपैकी प्रत्येकी एक झोका तुटलेला आहे. त्यामुळे मुलांना झोके घेताना अडचणी येतात. केवळ दोन झोके असल्याने इतर मुले कधी उतरतात, झोके मोकळे होतात, याची वाट पाहवी लागते. याबाबत आपल्या कार्यालयात यापूर्वीही तक्रारी केल्या आहेत. संबंधितांना तातडीने हे झोके दुरुस्त करण्याचे अथवा नव्याने बसविण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या उद्यानातील झोके नेहमीच तुटलेल्या अवस्थेत असल्याचा संताप उद्यानात येणाऱ्या नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागे बदक असलेले खेळणे मुलांना वापरताही आले नाही, प्रशासनाने ते काढून फेकून दिले. उद्यान व क्रिडांगणात गेल्या काही वर्षापासून विविध समस्या व बकालपणा असतानाही पालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


