सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार येथील पालिका शाळेसमोरील नर्सरीलगतच्या पदपथावरील तुटलेली, दबलेली झाकणे हटवून त्या ठिकाणी नवीन झाकणे बसविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नेरूळ सेक्टर चारमध्ये महापालिकेची शाळा आहे. या शाळेलगतच नर्सरी असून या नर्सरीलगतच असलेल्या पदपथावरील गटारांची झाकणे आजमितीला दुरावस्थेत आहेत. ही झाकणे काही ठिकाणी तुटलेली आहेत तर काही ठिकाणी दबलेली आहे. सकाळी व संध्याकाळी या परिसरातील रहीवाशी चालण्यासाठी या पदपथावरुन ये-जा करत असतात. तुटलेल्या, दबलेल्या गटारांच्या झाकणामुळे ये-जा करणारे रहीवाशी त्यात पडून अथवा घसरुन त्यांना गंभीर शारिरीक इजा होण्याची भीती आहे. तरी समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना या तुटलेल्या, दबलेल्या झाकणांच्या ठिकाणी नवीन झाकणे बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


