नवी मुंबई : कुकशेत गावातील प्रवेशद्वारालगतच बांधलेल्या अतिउंचीच्या गतीरोधकाची चौकशी करुन त्याची उंची कमी करणेबाबत तसेच नेरूळ सेक्टर सहामधील एका महिलेचा या गतीरोधकामुळे अपघात झाल्याने त्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून चार-पाच दिवसांपूर्वीच नेरूळ पश्चिमेला गतीरोधक बसविण्यात आले आहेत. त्यात कुकशेत गावामध्ये प्रवेश करताना वेशीलगत वळसा मारण्यापूर्वी हॉलच्या समोरील रस्त्यावरही गतीरोधक बसविला आहे. या गतीरोधकाची उंची प्रशासनाने अवास्तव ठेवली असून या गतीरोधकामुळे अपघात होण्याची भीती गतीरोधकाचे काम करणाऱ्या कामगारांना माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी त्याचवेळी व्यक्त केली होती. या गतीरोधकामुळे हमखास अपघात होणार असे रतन मांडवेंनी त्या कर्मचाऱ्यांना सांगितलेही होते. रविवारी दुपारी २.३०च्या सुमारास सविता सपकाळ या नेरूळ सेक्टर सहामधील महिलेचा अपघात झाला. या महिलेचा मुलगा गाडी चालवत असताना या गतीरोधकावरुन जाताना ती महिला खाली पडून जखमी झाली आहे. आता तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. आपण आल्यास मी स्वत: आपणास रुग्णालयात घेवून जाईल. हे प्रकरण गंभीर आहे. चुकीच्या पद्धतीने गतीरोधकाला उंची दिलेल्या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी होणे आवश्यक आहे. येत्या काळात आणखी अपघात होण्याची शक्यता असून या गतीरोधकाची उंची करणे आवश्यक आहे. माजी नगरसेवक रतन मांडवे यांच्या सूचनेची दखल घेवून गतीरोधकाची उंची कमी केली असती तर हा अपघात टळला असता. या अपघातप्रकरणी जबाबदार असणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


