स्वयम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर १० मध्ये असलेल्या सेन्सरी (संवेदना) उद्यानात वीज नसणे, फाटलेले- तुटलेले कारपेट, शौचालयाची समस्या यावरुन उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी शनिवारी संताप व्यक्त करत पालिका प्रशासनाच्या व आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली व लवकर कार्यवाही न झाल्यास पालिका आयुक्तांच्या दालनात व निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे.
सानपाडा सेक्टर १० मध्ये महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी सेन्सरी (संवेदना) उद्यानाची निर्मिती केली आहे. परंतु उद्यानाच्या निर्मितीनंतर देखभाल करण्यास उदासिनता दाखविल्याने तेथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पालिकेने चालण्याच्या मार्गिकेवर टाकलेले कारपेट ठिकठिकाणी तुटले असून फाटलेले आहे. यात पाय अडकून अनेक ज्येष्ठ नागरिक पडले आहेत. त्यांना शारीरीक जखमाही झालेल्या आहेत. तसेच उद्यानात पहाटे ५ वाजता ज्येष्ठ नागरिक, महिला चालण्यासाठी येतात, त्यावेळी वीज नसल्याने त्यांना अंधारातच व्यायाम करावा लागतो. उद्या लुटमार, छेडछाड अथवा अन्य दुर्घटना घडण्याची भीती आहे. उद्यानातील शौचालयाच्या समस्येबाबतही उद्यानात येणारे नागरिक विविध तक्रारीचा पाढा वाचत आहेत. या उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी आपल्या समस्या कॉंग्रेसचे कार्यकर्ते रविंद्र सावंत यांना सांगितल्या असता, त्यांनी या उद्यानातील समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून त्यांना आता केवळ फाईल मंजुर झाली असून आयुक्तांच्या टेबलवर मंजुरीसाठी ठेवली आहे, इतकेच उत्तर गेल्या काही दिवसांपासून मिळत आहे. शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला व संताप व्यक्त झाला. स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनासह पालिका आयुक्तांचा निषेध करत यापुढे महापालिका मुख्यालयात जावून आयुक्तांच्या दालनातच आंदोलन करण्याचा इशारा दिला. कॉंग्रेसचे कार्यकर्ते रविंद्र सावंत यांनीही यावेळी पालिका प्रशासनाचा निषेध करताना कामाला टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप करताना मोठी दुर्घटना झाल्यावरच पालिका काम करणार काय? , असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.



