नवी मुंबई : सानपाडा सेक्टर सहामध्ये सानपाडा बेकरीमध्ये लाकडाचा इंधन म्हणून वापर होत असल्याने सभोवतालच्या परिसरातील रहिवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. त्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडेही तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने त्यांनी कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांना या समस्येतून सुटका करण्यासाठी साकडे घातले. सानपाडावासियांच्या तक्रारीची दखल घेत पालिका अधिकाऱ्यांसमवेत बेकरीचा भेट देत समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी रविंद्र सावंत यांनी विभागातील अन्य समस्यांचीही पाहणी करत पालिका अधिकाऱ्यांना या समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली.
सानपाडा सेक्टर सहामध्ये असलेल्या सानपाडा बेकरीमुळे सानपाडा सेक्टर सहा व दहा तसेच सभोवतालच्या परिसरातील रहीवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. सेक्टर दहामधील श्री गणेश कृपा सहकारी संस्थेने पालिकेकडे लेखी तक्रारही केली होती. तथापि सानपाडा बेकरीमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर होत असल्याने प्रचंड प्रमाणात धुराचे प्रदूषण होते. सोसायटीतील रहिवाशांच्या डोळ्यांना जळजळण्याचा त्रास जाणवत होता. वारंवार बेकरीवाल्या सांगून बेकरीवाल्यांकडून समस्यांबाबत निवारण केले जात नव्हते. पालिका प्रशासन तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने रहीवाशांनी रविंद्र सावंत यांची भेट घेत समस्या सोडविण्यासाठी त्यांना साकडे घातले. रविंद्र सावंत यांनी समस्येचे गांभीर्य जाणून घेत पालिका सानपाडा-तुर्भे विभाग कार्यालयातील विभाग अधिकाऱ्यांकडे संपर्क करत त्यांना समस्या निवारण करण्याची विनंती केली. विभागातील अधिकारी मुख्य स्वच्छता अधिकाऱ्यांसमवेत रविंद्र सावंत यांनी पाहणी अभियान केले असता, पाहणी अभियानात तेथील बांधकाम, इंधनासाठी वापरली जाणारी लाकडे निदर्शनास आली. चिमणी नावालाच असून रात्रीच्या वेळी बेकरीतील धूर परिसरात पसरुन रहिवाशांना डोळे चुरचुरणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे आदी आजार वाढत असल्याचे यावेळी निदर्शनास आले व स्थानिक लोकांनीही बेकरीबाबत तक्रारींचा पाढा वाचला. स्थानिकांनी बेकरीवाल्यांकडे यापूर्वी तक्रार केली असता, बेकरीवाल्यांने त्यांना न जुमानता काम चालूच ठेवल्याने प्रदूषणात वाढ होवून लोकांच्या जिवीतालाही धोका निर्माण झाला. सावंत यांनी विभाग अधिकारी कार्यालयाला संपर्क केल्यावर पाहणी पथकाने पाहणी करुन बेकरीला नोटीस दिली. सावंत यांच्या सक्रियतेमुळे स्थानिक रहिवाशांनी रविंद्र सावंत यांचे आभार मानले. यावेळी नाल्यातून येणारी दुर्गंधी, तुटलेले पदपथ यांचीही सावंत यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. सावंत यांच्या तक्रारीची दखल घेत पालिकेने परिसरात स्वच्छता अभियानही राबविले.



