नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३ मधील जुई गावातील नाल्यावरील, गटारावरील तुटलेल्या झाकणांच्या जागी तातडीने नवीन झाकणे तातडीने बसविण्याची लेखी मागणी कॉंग्रेसचे जुईनगर वॉर्ड अध्यक्ष बाबुराव ठाकूर यांनी नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे
जुईनगर सेक्टर २३ मधील जुई गाव, गायत्री निवास घर नंबर १६८३ व राधाकृष्ण निवास १६६५ समोर स्थानिक नागरिकांना येजा करण्यासाठी छोटा रस्ता आहे. रस्त्यावरील नाल्यावर असणारे सिमेंटचे झाकण तुटलेले आहे. या ठिकाणाहून ये-जा करताना लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेल्या झाकणांमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे ताबडतोब त्या ठिकाणी नवीन सिमेंटचे झाकण टाकून नागरिकांना ती जागा चालण्यायोग्य बनविण्यात यावी. साई स्पोर्र्ट दुकानासमोर असलेल्या पदपथावरही तीच समस्या आहे. तेथेही चालताना मोठा अपघात होऊ शकतो. लहान मूल अथवा ज्येष्ठ नागरिक तेथे पडले तर त्यांच्या जिवितालाही धोका निर्माण होवू शकतो. लोकांच्या चालण्यासाठी बनविलेले पदपथ आज तुटलेल्या झाकणांमुळे अपघाताला निमत्रंण देत आहेत. पदपथांच्या खाली असणाऱ्या नाल्याची सफाई करण्यासाठी बनविलेल्या चेंबरवर मोठे सिमेंटचे झाकण बसविण्यात आले आहे. ते झाकणच आज तुटून गेले आहे. त्यावर लाकडी फळ्या टाकून स्थानिक रहिवाशी ये-जा करत आहेत. नवी मुंबई शहराला हे चित्र भूषणावह नाही. या परिसरात गटारे, नाल्यावरील तुटलेली झाकणे त्वरीत न बदलल्यास अपघात होवून जिवितहानी अथवा जायबंदी होण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता तात्काळ संबंधितांना झाकणे बदलण्याचे निर्देश देण्याची मागणी बाबुराव ठाकूर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.



