सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी व सार्वत्रिक निवडणूका पारदर्शक रितीने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी अशा जवळजवळ ६ हजार कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त तथा निवडणुक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये २८ प्रभागांमधील १११ जागांकरिता १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक होणार आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात महापालिका क्षेत्रात ११४८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ८ विभागांसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी ३ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच १८० क्षेत्रीय अधिकारी कार्यरत आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुनियोजित पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, तसेच प्रत्येकी ३ सहाय्यक मतदान अधिकारी, शिपाई अशी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारची राखीव पथकेही ठेवण्यात आली आहेत. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे निवडणूक काम करता पहिले प्रशिक्षण १ ते ७ जानेवारी या कालावधीत विष्णुदास भावे नाटयगृह वाशी आणि सरस्वती विद्यालय, ऐरोली येथे विभागनिहाय सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.
१ जानेवारी रोजी नेरुळ विभाग, २ जानेवारी रोजी बेलापूर विभाग, ४ जानेवारी रोजी दिघा विभाग, ५ जानेवारी रोजी घणसोली विभाग, ६ जानेवारी रोजी दोन सत्रात कोपरखैरणे व तुर्भे विभाग, तसेच ७ जानेवारी रोजी वाशी विभागातील मतदान केंद्रांसाठी नेमलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे होणार आहे. तसेच ६ जानेवारी रोजी ऐरोली विभागातील मतदान केंद्रांसाठी नेमलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण सरस्वती विदयालय से.५ ऐरोली या ठिकाणी होणार आहे.
अशाच प्रकारे दुसऱ्या प्रशिक्षण वर्गाचेही ८ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीतील वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतदान साहित्य तपासणी व वितरण, मतदार यादीचा वापर, मतदाराची ओळख पडताळणी, मॉकपोल प्रक्रिया, मतदान यंत्र सिलींग प्रक्रिया, कायदेशीर बाबी अशा निवडणूकीशी संबंधित विविध बाबींची माहिती देण्यात येणार असून विविध शंकांचे निरसनही केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीनची प्रत्यक्ष हाताळणी प्रात्यक्षिकही करुन घेतले जाणार आहे.
००० ००० ००
प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असून गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पाडण्यासाठी व कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये आणि गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले असून प्रशिक्षणाची तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी यांना स्वतंत्रपणे कळविण्यात आली आहे.
निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असून अनुपस्थित राहणाऱ्या व आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल.
– डॉ.कैलास शिंदे , आयुक्त, नवी मुंबई महापालिका



