नवी मुंबई : कॉंग्रेसचा आक्रमक व लढवय्या चेहरा आणि गेल्या काही वर्षांत आंदोलने, निदर्शने, चळवळी अशा माध्यमातून कॉंग्रेसचे अस्तित्व नवी मुंबई कार्यक्षेत्रात जिवंत ठेवणारा सर्वसामान्यातील आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जाणारे रविंद्र सावंत यांनी मंगळवारी पहाटे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे प्रभाग २२च्या राजकीय व सामाजिक समीकरणात बदल झाला आहे. हा बदल शिवसेनेला अनुकूल असून प्रभाग २२ मधून शिवसेनेच्या पॅनलला मोठ्या प्रमाणावर बळकटी प्राप्त झाली आहे.
रविंद्र सावंत हे नवी मुंबई कॉंग्रेसमधील गेली अनेक वर्षे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जायचे. कॉंग्रेसमध्ये पदे उपभोगून नावारुपाला आलेल्या अनेक रथी-महारथी नेत्यांनी कॉंग्रेस सोडून अन्य पक्षांची कास धरली. कॉंग्रेसच्या पडझडीच्या काळात रविंद्र सावंत या शिलेदारांने केवळ कॉंग्रेसची पडझडच थांबविली नाही, तर कॉंग्रेसला उभारी देताना कॉंग्रेसचा जनाधार वाढविण्याचे काम रविंद्र सावंत या एकमेव नेतृत्वाने केले आहे. कॉंग्रेसचा नवी मुंबईतील एकमेव आंदोलनात्मक चेहरा अशी ठाणे जिल्ह्यात रविंद्र सावंत यांची ओळख होती. राजकीय कार्य करताना कामगार क्षेत्रातही गेल्या काही वर्षात केलेल्या कार्यामुळे कामगार नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. महापालिका, बाजार समिती, एमआयडीसीतील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे त्यांना पाठबळ आहे. गेली अनेक वर्षे कॉंग्रेससाठी राबणाऱ्या रविंद्र सावंत या नेतृत्वाला निवडणूक लढविण्यासाठी हव्या असलेल्या प्रभागातून उमेदवारी अर्ज देण्यास पक्षाकडून नकार देण्यात आल्याने सोमवारी रात्रीपासून वातावरण तापण्यास सुरुवात झाली. नेरूळ सेक्टर सहामधील कॉंग्रेसचे माजी वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांच्यापासून कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कामगार संघटनेच्या सदस्यांनी, स्थानिक रहिवाशांनी रविंद्र सावंत यांच्या कार्यालयात धाव घेत ‘आता बस झाले, कामाची दखल घेत नसेल पक्ष तर आता स्वतंत्र निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचा नेता आम्हाला सभागृहात पाहिजे. कॉंग्रेसला आपल्या कामाची किंमत नसेल तर अजून किती वर्षे वाट पाहायची’ असा संतप्त सूर आळवण्यास सुरुवात केली. तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा, आम्हाला मात्र आता कॉंग्रेससाठी काम करण्याचा आग्रह करु नका, आम्हाला तुम्ही नगरसेवक म्हणून पाहिजे, योग्य निर्णय लवकर घ्या, असे रविंद्र सावंत यांना अनेकांनी सुनावले. रविंद्र सावंत यांनी तिकिटसाठी कॉंग्रेसकडून चालढकल होवू लागल्याची कुणकुण इतर पक्षामध्ये लागताच शिवसेनेसह इतरांनी त्यांना संपर्क करण्यास सुरुवात केली. कॉंग्रेसबाबत कार्यकर्ते, समर्थंक तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी यांचा वाढत चाललेला संताप, स्थानिक रहिवाशांकडून निर्णय घेण्याचा वाढता आग्रह यामुळे रविंद्र सावंत यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पक्ष सोडल्याचा निर्णय घेताना रविंद्र सावंत भावनिक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होते. ज्या पक्षासाठी उभी हयात घालविली, त्या पक्षाकडून होत असलेला अन्याय पाहता, तो पक्ष सोडताना रविंद्र सावंत कमालीचे भावनिक झाले होते. अखेर जवळचे कार्यकर्ते, निष्ठावंत समर्थंक, पदाधिकारी व स्थानिक रहीवाशी यांच्याशी चर्चा करुन मंगळवारी पहाटे शिवसेनेचे धनुष्यबाण स्विकारण्याचा निर्णय रविंद्र सावंत यांनी घेतला.
प्रभाग २२ मधून कामगार नेते रविंद्र सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करताच शिवसेनेनेही त्यांच्या आजवरच्या कार्याचा मानसन्मान राखत त्यांना हव्या असलेल्या प्रभागातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. या प्रभागातून शिवसेनेकडून माजी नगरसेवक रंगनाथ औटी, बाबाजी इंदोरे यांच्या ताकदीला आता रविंद्र सावंत यांची ताकद मिळाल्याने या प्रभागात शिवसेनेला बळकटी प्राप्त झाली आहे. नेरूळ सेक्टर २,४, जुईनगर नोड, सानपाडा सेक्टर दहा-सहा परिसरात रविंद्र सावंत यांचा स्वतंत्र जनाधार आहे. या प्रभागात स्वत:ची चार जनसंपर्क कार्यालये असणारे रविंद्र सावंत हे एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे रविंद्र सावंत यांचा शिवसेना प्रवेश जुईनगर नोड, नेरूळ सेक्टर २,४ तसेच सानपाडा सेक्टर ६,१० येथील राजकीय समीकरणात उलथापालथ करणारा असून या पक्षप्रवेशामुळे या प्रभागात शिवशक्ती व भीमशक्तीचा मिलाफ झाल्याचे पहावयास मिळाला असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



