स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : आरक्षण सोडतीमध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये महापौर पद महिला सर्वसाधारण आरक्षित झाल्यावर महिला नगरसेवकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. भाजपमध्ये निवडून आलेल्या महिला नगरसेववकांची संख्या लक्षणीय असून माजी स्थायी समिती सभापती नैत्रा शिर्के, माथाडी कामगार चळवळीतील भारती पाटील आणि नव्याने निवडून आलेल्या वैष्णवी वैभव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षश्रेष्ठी, राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि स्थानिक भागातील नेते वनमंत्री गणेश नाईक कोणाकडे नवी मुंबईच्या महापौर पदाची धुरा सोपवितात, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
नेत्रा शिर्के, भारती पाटील, वैष्णवी या चार नावांची महापौर पदासाठी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. नेत्रा शिर्के या अनुभवी असून प्रशासकीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. स्थायी समिती सभापतीपदापदाचा त्यांना अनुभव आहे. नाईक परिवाराच्या निष्ठावंत म्हणून त्यांची प्रतिमा आहे. सलग चौथ्यांदा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. भारती पाटील या माथाडी चळवळीचे श्रद्धास्थान असणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांच्या त्या कन्या असून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. माथाडी चळवळीतील महिलेला महापौरपदी विराजमान करण्याची मागणी पुढे येवू लागली आहे. वैष्णवी नाईक या प्रथमच निवडून आल्या असून वैभव नाईक यांच्या त्या पत्नी असून नवी मुंबईचे पाचवे महापौर तुकाराम नाईक यांच्या त्या सुन आहेत.
महापौरपदासाठी अन्य नावे चर्चेत असली तरी नेत्रा शिर्के, भारती पाटील, वैष्णवी नाईक हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नवी मुंबई महापालिकेवर वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्रवाखाली भाजपने एकहाती बहूमत प्राप्त केले असल्याने महापौर निवडीमध्ये गणेश नाईकांचा निर्णय अंतिम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



