महापौर, शहराचा प्रथम नागरिक. या महापौर पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी केवळ कर्तृत्व नाही तर कर्तृत्वाला नशीबाचीही जोड असावी लागते. नशिब यासाठी की, महापौरपदासाठी पडणाऱ्या आरक्षणाची गणितेही त्यासाठी जुळून यावी लागतात. नशिब यासाठी की, संदीप नाईकांकडे कर्तृत्व, नेतृत्व दोन्ही होते. पण महापालिकेच्या तिसऱ्या सभागृहात संदीप नाईक नगरसेवक असताना दोन्ही वेळेस महापौरपद महिला आरक्षित झाल्याने नवी मुंबईचे महापौर होण्याचा योग संदीप नाईकांच्या नशिबी नव्हता. भाजपकडून आज नवी मुंबईच्या महापौरपदासाठी सुजाताताई पाटील व उपमहापौरपदासाठी दशरथ भगत यांनी उमेदवारी अर्ज भरले. सभागृहातील संख्याबळाच्या तुलनेत ६० टक्के लोकप्रतिनिधी भाजपचे असल्याने सुजाताताई पाटील यांना महापौर होण्यात व वाशी गाव, सानपाडा पामबीचच्या नानांना उपमहापौर होण्यास अडथळे येणार नाहीत. कोणतेही पद मिळण्यासाठी नशिबही अनुकूल असावे लागते, असे मघाशीच म्हटले होते. मागील सभागृहात नानीला उपमहापौरपदाच्या निवडणूकीत अवघ्या तीन मतांवर समाधान मानावे लागले होते आणि त्याच नानीचे यजमान असलेले सानपाडा पामबीच परिसराचे लाडके नाना उपमहापौरपदी गुरुवारी विराजमान होणार आहे.
नवी मुंबई ही सुशिक्षितांची नगरी आहे. पुण्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या भुतलावर विद्येचे माहेरघर असेल तर ते केवळ नवी मुंबई आहे. या शहरामध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा मुबलक आहेत. त्यामुळे साहजिकच या नगरीचा महापौरही उच्चशिक्षित असावा, असा विचार भाजपश्रेष्ठींनी नक्कीच केला असावा. भाजप कोणतेही पद सहजासहजी देत नाही. विचारपूर्वकच सर्व निर्णय घेते. भाजपने २०१९ साली नवी मुंबईचे शिल्पकार असलेल्या लोकनेते गणेश नाईकांना तसेच २०२४ साली नवी मुंबईचे विकासपर्व असणाऱ्या संदीप नाईकांना विधानसभेचे तिकिट दिले नव्हते. सुजाताताई पाटील या उच्चशिक्षित तर आहेच, परंतु कुटूंबवत्सल आहेत. एकत्र कुटूंबपद्धतीच्या सदस्या आहेत. वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असणाऱ्या सुजाताताई पाटील या काही अंशी मितभाषी आहेत. अवास्तव बोलणे, चमकेशगिरी करणे हे सुजाताताई पाटील यांना कधी जमले नाही व यापुढील काळातही त्यांना जमणार नाही.
तुकाराम मुंडे हे महापालिका आयुक्त असताना प्रतिमाणशी १३५ लीटर पाण्याची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात होती. सुजाताताई पाटील यांच्या मतदारसंघातील सिडको वसाहतीमधील एव्हरग्रीन सोसायटीत पाण्याची तीव्र टंचाई होती. पाणीटंचाईच्या समस्येने स्थानिक लोक त्रस्त झाले होते. तुकाराम मुंडे आयुक्त असताना भल्याभल्यांना घाम फुटायचा. एव्हरग्रीनच्या पाणीसमस्येच्या निवारणासाठी पालिका प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे पाहून महासभेत थेट जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होत सुजाताताईंनी आपला निषेध व रोष व्यक्त केला होता. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी साध्या, सोज्वळ असलेल्या सुजाताताई पाटील वेळ पडल्यास झाशीची राणीही होवू शकते, हे त्यादिवशी सभागृहाने पाहिले होते.
आज महाराष्ट्रात ककरोगाचा विळखा वाढत चालला आहे. सुजाताताई पाटील या दूरदृष्टीच्या लोकप्रतिनिधी आहेत. काही वर्षापूर्वी पालिका सभागृहात विषय समितीच्या सभापती म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रभागाप्रभागामध्ये कर्करोगाच्या आजारावरील शिबिरे राबवली होती. पालिका कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर शहराचा कारभार हाकणाऱ्या नगरसेवकांसाठीही सुजाताताई पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून कर्करोग शिबीराचे आयोजन केले होते.
सुजाताताई पाटील या अंत्यत संवेदनशील आहेत. स्वत:ला किती त्रास झाल्या तरी त्या वेदना चेहऱ्यावर व्यक्त करत नाही. राग येणे, उद्रेक व्यक्त करणे हा सुजाताताई पाटील यांचा स्वभाव नाही. माफ करण्यासाठी अंगी धाडस असावे लागते. सुजाताताई या मुळच्या क्षमाशील व्यक्तिमत्वाच्या. सुशिक्षितांच्या नवी मुंबईला सुजाताताई पाटील यांच्या रुपाने वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेला सुशिक्षित चेहरा लाभला आहे. जी एकत्र कुटूंबपद्धतीत राहून कुटूंब सांभाळू शकते, त्या सुजाताताईला शहराचा सांभाळ करणे अवघड जाणार नाही. मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्षांची वाढ होत नाही, असे म्हटले जाते, पण या उक्तीला सुजाताताई पाटील अपवाद ठरल्या आहे. सासरी धार्मिक वातावरण, यजमान राजकारणातील युवा चळवळीतील नावाजलेले व्यक्तिमत्व. पण याहीपलिकडे जावून सुजाताताई पाटील यांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आपल्या कर्तृत्वावर निर्माण केले आहे. आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. सुजाताताई पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.



