नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील गावागावामध्ये फायर हायड्रेंट यंत्रणा कार्यान्वित करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत दिघा ते बेलापुरदरम्यानचा परिसर येतो. या ठिकाणी नागरीकरणाची प्रक्रिया वेगाने विकसित झाल्याने हे शहर आज पूर्णपणे विकसित झालेले आहे. तथापि या शहरामध्ये आजही गावांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. शासकीय गरजेपायी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचे पुनर्वसन करण्यासाठी नवी मुंबई शहर विकसित करण्यात आले. शहरी भाग नियोजित असल्याने तेथे आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमनची वाहने कानकोपऱ्यात जावू शकतात. परंतु नवी मुंबई शहरामध्ये गावे असल्याने त्या गावांमध्ये अग्निशमनची वाहने जावू शकत नाही. ग्रामस्थांनी गरजेपायी बांधलेल्या इमारतींमुळे तसेच अन्य सुविधांचा अभाव असल्याने गावामध्ये आग लागल्यास अग्निशमन विभागाला आग विझविताना मर्यादा पडतात. हानी वाढते. अरुंद रस्त्यामुळे वाहने जात नाही, कर्मचाऱ्यांना आग विझविताना अडचणी येतात. यावर कोठेतरी बदल झाला पाहिजे? उपाययोजना शोधली पाहिजे. गावात लागणाऱ्या आगीच्या घटना व त्या घटनांमध्ये होणारी हानी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने गावागावामध्ये, गावातील अंर्तगत भागात फायर हायड्रेंट यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे.फायर हायड्रेंट यंत्रणेमुळे गावात आग लागल्यास ती विझविण्यासाठी तात्काळ पाणी उपलब्ध होईल. ही यंत्रणा ब्रिटीशकालीन असली तरी सध्या या यंत्रणेची गरज आहे. ग्रामस्थांना आगीच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी, हानी टाळण्यासाठी फायर हायड्रेंट यंत्रणा युद्धपातळीवर राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
