सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ८ मार्च, २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेमार्फत महापालिका क्षेत्रातील ‘विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना पुरस्कार’ वितरण तसेच महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांनी उत्पादित केलेल्या साहीत्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यामध्ये नमुंमपा कार्यक्षेत्रातील महिलांकरीता ४ मार्च ते दि.६ मार्च या कालावधीत समुह गायन स्पर्धा, महिला भजनी मंडळ भजन स्पर्धा, लहान व्हिडीओ स्पर्धा – (विषय : महिला सुरक्षितता विषयक जनजागृती, पर्यावरण, शिक्षण), समुह नृत्य स्पर्धा (विषय – कोळीनृत्य), समुह नाटिका स्पर्धा आणि मंगळागौर स्पर्धा अशा ६ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांची प्राथमिक फेरी व अंतिम फेरी महात्मा फुले स्मृती भवन, भूखंड क्र.१२/१३, तिसरा मजला, सेक्टर-३, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी घेण्यात येईल.
तसेच ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या दिवशी या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच पुरस्कार वितरण समारंभ विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी या ठिकाणी संपन्न होणार आहे.
या स्पर्धांमधील सहभाग, पुरस्कारासाठीची नामांकने व वस्तु विक्री स्टॉल करिता आवश्यक अर्ज सर्व विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महापालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. ११, सी.बी.डी., बेलापूर येथे उपलब्ध आहेत.
या स्पर्धांमधील सहभागाकरीता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २ मार्च असून पुरस्कार व वस्तु विक्री स्टॉल करीता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ४ मार्च असणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांकरीता ‘पैठणी लकी ड्रॉ’ स्पर्धा कार्यक्रमाचे ठिकाणी घेण्यात येणार आहे.पुरस्कार नामांकन व विक्री स्टॉल बाबतची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महापालिकेची सर्व विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, सेक्टर ११, सी.बी.डी., बेलापूर येथे शासकीय सुट्टया वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील तसेच अर्जही स्विकारले जातील.
उक्त विक्री स्टॉल उपलब्ध करुन घेण्यासाठी फक्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था अर्ज करू शकतात. दाखल केलेल्या अर्जांपैकी एक अथवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार नमुंमपा आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांनी राखून ठेवला आहे याची नोंद घेण्यात यावी. अधिक माहितीसाठी विभागनिहाय संपर्कध्वनी व समन्वयक –
श्री. मिथून म्हात्रे : ९८६७२३१४०३ बेलापूर.
श्रीम. प्रियंका पाटील : ९०८२३११४४०, नेरुळ.
श्री. सुंदर परदेशी : ९५९४८४१६६६, वाशी व तुर्भे.
श्री. दादासाहेब भोसले : ९३७२१०६९७६, कोपरखैरणे व घणसोली.
श्री. दशरथ गंभिरे : ९७०२३०९०५४, ऐरोली व दिघा.
तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व इतर उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

