संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी दिल्ली : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील निर्णायक सामना भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी क्वार्टर फायनलचा सामना होता. कारण जो संघ जिंकणार तो थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार होता. या महत्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ गडी राखून विजयाची नोंद केली आहे. भारताकडून संजू सॅमसन हा विजयाचा हिरो ठरला.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९६ धावा करायच्या होत्या. निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघासमोर इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणं मुळीच सोपं काम नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. सलामीला आलेला अभिषेक शर्मा अवघ्या १० धावा करून माघारी परतला. तर इशान किशन देखील १० धावा करून माघारी परतला. कर्णधार सूर्यकुमार यादवकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या १८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. तिलक वर्मा २७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने १७ धावांचे योगदान दिले. पण सलामीला आलेला संजू सॅमसन शेवटपर्यंत उभा राहिला. संजूने नाबाद ९७ धावांची खेळी करून भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.
वेस्ट इंडिजने केल्या १९५ धावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने ४ गडी बाद १९५ धावा केल्या. सलामीला आलेल्या शे होपने ३२ धावांचे योगदान दिले. तर रोस्टन चेसने ४० धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी मिळून ६८ धावा जोडल्या. शिमरन हेटमायरला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. तो २७ धावांवर माघारी परतला. रुथरफोर्डने १४ धावा केल्या. शेवटी फलंदाजी करताना रोमन पॉवेलने नाबाद ३४ आणि जेसन होल्डरने नाबाद ३७ धावा केल्या.


