नवी मुंबई : एक वर्षांहून अधिक कालवधी झाला, तरी दिव्यांग व्यक्तिंचे स्टॉल सुरु न झाल्याने तिथे अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. पालिकेने ते स्टॉल हटवून तिथे स्वच्छता अभियान राबविण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नेरुळ सेक्टर ८ मधील एल मार्केट परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, सध्या या स्टॉलच्या जागेबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने हे स्टॉल बराच काळ वापराविना पडून आहेत.
सद्यस्थितीत या स्टॉलचा वापर नसल्यामुळे स्टॉलवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली असून ते खराब होत आहेत. स्टॉलच्या आजूबाजूला कचरा साचून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी, प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन, जोपर्यंत कायदेशीर प्रक्रियेचा निकाल लागत नाही, तोपर्यंत हे स्टॉल तिथून हटवावेत आणि संबंधित परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
एल मार्केट परिसरात जागेवरुन महापालिका व स्थानिक असोसिएशनचा न्यायालयीन वाद असल्याने दिव्यांग व्यक्तीच्या गाळ्याचा वापर सुरु झालेला नाही. मात्र हे गाळे तिथेच पडून असल्याने अस्वच्छता पसरुन दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या जागेची स्वच्छता होणे आवश्यक आहे. पालिकेने तात्पुरत्या स्वरुपात ते गाळे तेथून हटवून निकाल लागल्यावर उचित कार्यवाही करण्याची प्रतिक्रिया निखिल मांडवे यांनी व्यक्त केली आहे.
