स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :ऐरोली विभागात शवागृहासह शवविच्छेदन सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली विभागांतर्गत दिवा गाव, गोठवली घणसोली, कोपरखैरणे, रबाळे, दिघा, चिंचपाडा, इळठणपाडा आदी परिसरातील नागरिकांना अनेक शासकीय आरोग्य सुविधांसाठी वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात जावे लागते. विशेषतः एखादा अपघात, आकस्मिक मृत्यू किंवा गुन्हेगारी घटना घडल्यास संबंधित मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यासाठी व शवगृहात ठेवण्यासाठी वाशी येथील रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना, स्थानिक नागरिकांना तसेच स्थानिक पोलिस बांधवांना पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. ऐरोली येथे नवी मुंबई महापालिकेची भव्य इमारत व जिजामाता रुग्णालय असूनही त्या ठिकाणी अद्याप पोस्टमॉर्टम केंद्र व शवगृहाची सुविधा उपलब्ध नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. ऐरोली विभागातील वाढती लोकसंख्या व नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन जिजामाता रुग्णालय, ऐरोली येथे तात्काळ पोस्टमॉर्टम केंद्र व शवगृह सुरू करण्याची मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
