महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारांचा कामगार दिनानिमित्त सन्मान
तेजल नेने-मोरजकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या स्थापना दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत, राष्ट्रध्वजवंदन संपन्न झाले.
यावेळी शासन परिपत्रकानुसार प्रथम ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देत ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत आणि तद्नंतर १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्र शासनाने अंगीकृत केलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत ध्वनीप्रसारित करुन मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ उपआयुक्त संजय शिंदे, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ. अमोल पालवे, शिक्षण विभाग उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, उद्यान विभाग उपआयुक्त स्मिता काळे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे, आपत्ती व्यवस्थापन उपआयुक्त ललिता बाबर, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, क्रीडा विभाग उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच सर्व अधिकारी – कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कामगार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणाऱ्या कामगारांना सन्मानीत करण्यात आले. यामध्ये सविता धोत्रे, भिमराव कांबळे, विदेश कोळी, बाळु बनकर, विजय कांबळे या घनकचरा व्यवस्थापन विभागातील तसेच ऋषी कोळी (पाणी पुरवठा विभाग), संतोष दिघे (उदयान विभाग), सुनिता बोबडे (रुग्णालय आरोग्य विभाग), अरुण मलपेकर (नागरी आरोग्य केंद्र आरोग्य विभाग), दिपक शेरखान (मलनि:सारण विभाग) या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत संतांची व महावीरांची भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्राला सामाजिक कार्याच्या माध्यमातून व पर्यावरणाचे भान राखून पुढे नेऊया असे आवाहन केले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहीमेअंतर्गत प्लास्टिकपासून पुनर्निर्मित केलेले बेंचेस बनविण्यात आलेले असून अशा विविध उपक्रमांतून आपण नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त व पर्यावरणशील बनवूया असे महापौरांनी सांगितले. आजपासून सुरु होत असलेल्या जनगणनेच्या कामामध्ये सर्व नागरिकांनी देशाच्या विकासासाठी सहभागी होऊन सहकार्य करावे असेही आवाहन महापौर महोदयांनी यावेळी केले.
हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असून त्यांना आदरांजली अर्पण करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतांनाच श्रमाला महत्व देणे ही आपली संस्कृती असून त्याच भावनेने आज महानगरपालिकेच्या विविध विभागात चांगले काम करणाऱ्या कामगारांना सन्मानित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आजपासून स्वयं जनगणनेला सुरुवात होत असून प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभागी होऊन सत्य माहिती भरावी आणि १४ जूनपासून घरी येणाऱ्या प्रगणकांनाही ही माहिती पुरवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने नवी मुंबईतून संकलित प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करुन बनविलेल्या प्लास्टिक बेन्चेसचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमासाठी गॅलेक्सी लिमिटेडने संघटनेस सीएसआर निधी उपलब्ध करुन दिला आहे. या प्रसंगी स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त श्रीम. वृषाली मगदुम तसेच गॅलक्सी लिमीटेडचे अमित गोरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यालयाच्या पॅसेजमध्ये रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी काढलेली आकर्षक रांगोळीसमवेत मान्यवरांसह नागरिकांनीही छायाचित्रे काढली. आयकॉनिक वास्तू म्हणून सुपरिचित असणाऱ्या नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीला ३० एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्यालय इमारतीसमोर हुतात्मा चौकाची भव्यतम प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ही विद्युत रोषणाई बघण्यासाठी आणि रोषणाई व प्रतिकृतीसमवेत सेल्फी काढण्यासाठी केवळ नवी मुंबईचेच नाही तर आसपासच्या शहरातील नागरिकही मुख्यालय परिसरात मोठ्या संख्येने भेट देत असतात.
