सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :: नवी मुंबई शहरामध्ये सिडकोच्या तसेच खासगी इमारतींच्या पुनर्बाधणीची कामे वेगाने सुरु होणार असल्याने त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर उपायायोजना करण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणीची कामे होत आहेत व या इमारती राहण्यायोग्य झाल्यावर तेथील लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होणार. या वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. सध्या काही भागांमध्येच पाणीपुरवठ्याची समस्या जाणवू लागली आहे. जर यावर योग्य वेळी नियोजन व उपाययोजना केल्या नाहीत, तर आगामी काळात गंभीर पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो. भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन पाणीपुरवठा नियोजन करण्यात यावे. नवीन इमारतींना परवानगी देताना पाणी उपलब्धतेचा अभ्यास बंधनकारक करावा. सर्व इमारतींमध्ये पावसाचे पाणी साठवण अनिवार्य करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. पाणीगळती रोखण्यासाठी व जलसंधारणासाठी विशेष मोहीम राबवावी. पर्यायी पाण्याचे स्रोत विकसित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. पाणी चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात यावी अशा उपाययोजना नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाला सुचविल्या आहेत.


