प्रवीण आजरा : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये असणारे महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व पामबीच मार्गालगत असणाऱ्या नेरूळ सेक्टर सहा ते वजरानी चौकापर्यतच्या मॉर्निग वॉकच्या मार्गिकेवर संगीत यंत्रणा बसविण्याची मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिका प्रशासनाने सुमारे दोन दशकापूर्वी वरुणा, एव्हरग्रीन, सागरदीप, दत्तगुरु या सिडको सोसायटींच्या मध्यभागी असलेल्या भुखंडावर उद्यान व क्रिडांगण विकसित केले आहे. या राजमाता जिजाऊ उद्यानात लोकार्पण झाल्यापासून महापालिका प्रशासनाने संगीत यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही. या उद्यानात सकाळी व संध्याकाळी सेक्टर सहामधील स्थानिक रहिवाशी तसेच सारसोळे गावातील ग्रामस्थ चालण्यासाठी येत असतात. ओपन जीममध्ये व्यायाम करण्यासाठी येत असतात. या रहिवाशांना व ग्रामस्थांना उद्यानात बसण्यासाठी आल्यावर अथवा मॉर्निंग वॉकसाठी आल्यावर संगीत कानावर पडल्यास त्यांना आनंदी व प्रसन्न वातावरणाचा लाभ घेता येईल. त्यांना फ्रेश वाटेल. शहरातील अन्य उद्यानांमध्ये संगीत यंत्रणा उपलब्ध असताना प्रशासनाने याही उद्यानात लवकरात लवकर संगीत यंत्रणा कार्यान्वित करण्याचे संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल रतन मांडवे यांनी केली आहे.
पामबीच मार्गालगत असलेल्या नेरूळ सेक्टर सहा ते वजरानी चौक यादरम्यान महापालिका प्रशासनाने काही वर्षापूर्वी मॉर्निंग वॉक विकसित केला आहे. या मार्गिकेवर चालण्यासाठी सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी नेरूळ पश्चिम भागातून तसेच जुईनगर परिसरातून मोठ्या संख्येने रहिवाशी येत असतात. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने संगीत यंत्रणा बसवून वाद्य संगीत ऐकवल्यास रहिवाशांना प्रसन्न वाटेल. चालण्यासाठी एक आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येईल. नवी मुंबईकरांची सकाळ प्रफुल्लित करण्यासाठी या मॉर्निग वॉकवर नव्याने संगीत यंत्रणा कार्यान्वित करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी केली आहे.

