जागतिक पर्यावरण दिनी वनमंत्री गणेश नाईक यांचा विश्वास
वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट
‘एक झाड, हरित महाराष्ट्र’
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध पर्यावरण उपक्रमांचे उद्घाटन
नागरिकांना वृक्षसंवर्धनाचे आवाहन
पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्राची हरित झेप
विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखत राज्यभर वृक्षारोपण लोकचळवळ उभारण्यावर भर
हरित क्रांतीकडे महाराष्ट्राची वाटचाल
सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानातून देशभरात वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी राहिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी ३०० कोटी वृक्षलागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचे भूमिपूजन, पर्यावरण जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रचार वाहनाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात वन कर्मचाऱ्यांना जंगलात स्वसंरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या किटचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. यावेळी गृह स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, गणेश शंकर, सरिता झोरे, अंकिता सावे, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) के. प्रदीपा, एन.आर. प्रवीण, वन विभागाच्या उपसचिव निकिता पांडे तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल इंधनांना पर्याय म्हणून सौर आणि पवन ऊर्जेसारख्या पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांवर भर देण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याचे काम शासन करत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांना जंगलातच खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी जांभूळ, पेरू, फणस यांसारख्या फळझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे वन्यप्राणी अन्नाच्या शोधात जंगलाबाहेर येण्याचे प्रमाण कमी होईल. डोंगरवस्त्या आणि पाड्यांपर्यंत रस्ते सुविधा पोहोचविण्यासोबतच देवराई आणि वनराई निर्माण करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या विनंतीनुसार सामाजिक वनीकरण विभागामार्फत मुंबईसाठी एक लाख वृक्षरोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वन कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा व आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून वनविभागासाठी रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील पाच विभागांमध्ये टिश्यू कल्चर केंद्रे सुरू झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात दर्जेदार रोपनिर्मिती केली जाणार आहे. २०४७ पर्यंत विकसित आणि सामर्थ्यवान भारत घडविण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आमदार मनीषा चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. ‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की, वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. वृक्षारोपण हा त्यावरील प्रभावी उपाय असून वृक्षांमुळे पाऊस वाढतो आणि पाणी संवर्धनास मदत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ३०० कोटी वृक्षलागवड अभियानाला नागरिकांनी कृतीशील प्रतिसाद द्यावा.
आमदार संजय उपाध्याय यांनी निसर्गाचा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी वृक्षारोपणासोबतच इंधन बचतीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
वाहनांचा वापर कमी करून सायकलचा वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आमदार प्रवीण दरेकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली वनविभागात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भव्य प्रवेशद्वार आणि आधुनिक ग्रंथालय उभारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी राज्यातील ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमेद्वारे महाराष्ट्रातील वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तर के. प्रदीपा यांनी राज्यातील टिश्यू कल्चर केंद्रांमधून दीड कोटी रोपांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेले हे उद्यान शहराचे ‘फुफ्फुस’ असल्याचे सांगितले. उद्यानाला पर्यटन आणि पर्यावरण शिक्षणाचे केंद्र बनविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून ३४ हेक्टर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीचे जंगल विकसित करण्यात येणार आहे. उद्यानात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जात असून पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

