नियमित तपासणी, प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांची मागणी
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : परिवहन विभागाच्या बसेसची नियमित तपासणी, वेळेवर देखभाल-दुरुस्ती आणि चालक-वाहकांना अधिक प्रभावी प्रशिक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबईतील दादर प्लाझा परिसरात ८ जून रोजी बेस्ट बसचा झालेला अपघात, त्यातील जीवितहानी आणि प्रवाशांच्या जखमी होण्याच्या घटनेचा संदर्भ देत सावंत यांनी बस सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अपघातानंतर चालकांनाच दोष दिला जातो; मात्र वाहनांची तांत्रिक स्थिती, नियमित देखभाल आणि प्रशासनाची जबाबदारी यांचाही तितकाच विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवेदनात म्हटले आहे की, बसांची वेळेवर डागडूजी आणि तपासणी न झाल्यास वाहने धोकादायक स्थितीत पोहोचतात. अशा परिस्थितीत नोकरी टिकवण्यासाठी चालकांना नादुरुस्त बसेस चालवाव्या लागतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
नवी मुंबई हे मुंबईप्रमाणेच वर्दळीचे शहर असून येथे वाहतूक आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत परिवहनचे चालक मोठ्या कौशल्याने वाहने चालवतात आणि ते प्रशंसेस पात्र असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. मात्र चालक कितीही कुशल असला तरी वाहन तांत्रिकदृष्ट्या असुरक्षित असेल तर अपघात टाळणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्युत बसेसच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर चालक आणि वाहकांना किमान एक महिन्याचे भरपगारी प्रशिक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. वाहनातील बिघाड ओळखणे, चार्जिंग व्यवस्थापन, तांत्रिक समस्या हाताळणे आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाणे याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
चालकांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी, वेळेचे बंधन, कामाचा ताण आणि आर्थिक अडचणी यामुळे चालकांवर मानसिक दबाव वाढतो. त्यामुळे त्यांचे नियमित समुपदेशन करण्यात यावे तसेच शासन नियमांनुसार सर्व सुट्ट्यांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, आठ तासांच्या कामकाजाच्या मर्यादेपेक्षा जास्त ड्युटी देऊ नये, कंत्राटी चालक-वाहकांना पुरेसे प्रशिक्षण द्यावे, वाहनांच्या तांत्रिक तक्रारींवर त्वरित कार्यवाही करावी आणि डबल ड्युटी मर्यादित ठेवावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
परिवहन कर्मचाऱ्यांसाठी अद्याप मेडिक्लेम सुविधा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करत सावंत यांनी आरोग्य संरक्षणासाठी तातडीने विमा सुविधा लागू करण्याची मागणी केली. तसेच महागाईच्या काळात कमी वेतनावर काम करणाऱ्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
परिवहन समितीने जाहीर केलेली वेतनवाढ तातडीने लागू करावी आणि “समान कामाला समान वेतन” या तत्त्वानुसार कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक ससेहोलपट सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कामगार नेते रविंद्र सावंत यांनी प्रशासनाने बस सुरक्षितता, कर्मचारी कल्याण आणि प्रशिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.



