ताफा थांबवून उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः उतरले
जखमींची केली विचारपूस
रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करत उपचारांवरही ठेवले लक्ष
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून रायगडावरून महाडकडे परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यावर अपघातग्रस्त झालेल्या दुचाकीस्वाराला मदतीचा हात देत पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली. शासकीय ताफा थांबवत ते स्वतः वाहनातून खाली उतरले, जखमींची आस्थेने विचारपूस केली आणि ताफ्यातील रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.
रायगडावरील शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे महाडकडे रवाना झाले होते. महाड-पाचाड मार्गावरील निर्जन रस्त्यावर एका दुचाकीचा मातीवरून घसरून अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ताफा थांबवला आणि अधिकाऱ्यांना जखमींची माहिती घेण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः घटनास्थळी जाऊन त्यांनी दोन्ही तरुणांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला आणि पाणीही दिले.
दोघांनी हेल्मेट परिधान केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी मागे बसलेल्या युवकाच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहताच शिंदे यांनी तातडीने ताफ्यातील रुग्णवाहिका बोलावली. आपल्या कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत पाठवत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे, तर उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती स्वतःला फोनवर कळविण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख पुन्हा एकदा या प्रसंगातून अधोरेखित झाली. शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्या विचारांचा आणि माणुसकीच्या संस्कारांचा प्रत्यय आपल्या कृतीतून देत, “पद मोठे असले तरी माणुसकी त्याहून मोठी” हा संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वागणुकीतून दिल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.

