अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमातील चालक-वाहन यांना तातडीने मेडिक्लेम सुविधा लागू करण्याची लेखी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसना अपघात होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढीस लागले आहे. त्यातच उभ्या असणाऱ्या बसेसने पेट घेण्याचे, आगी लागण्याचेही प्रकार घडत आहे. वाढत्या महागाईच्या काळात परिवहन उपक्रमामध्ये काम करणारे कायम आस्थापनेतील तसेच ठोक मानधनावरील सर्वच चालक-वाहकांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत आहे. या चालक-वाहकांना महापालिका प्रशासनाकडून मेडिक्लेमची सुविधा आजपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. हे चालक-वाहक आजारी पडले अथवा कामावर कार्यरत असताना अपघात घडल्यास त्यांना स्वखर्चांने उपचार करावे लागतात. त्यासाठी इतरांकडे कर्जासाठी हात पसरावे लागतात. चालक-वाहक स्वत: अथवा त्यांच्या कुटूंबातील कोणी आजारी पडल्यास मेडिक्लेम नसल्याने आरोग्य सुविधेसाठी त्यांना कर्ज मागण्याशिवाय पर्याय नसतो. घरभाडे, घरखर्च, मुलांचे शिक्षण, प्रवासखर्च व अन्य खर्च याचीच मिळवणी करताना तारेवरची कसरत या चालक-वाहकांना करावी लागत आहे. त्यातच आजारपण आल्यास चालक-वाहकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. चालक-वाहक हे महापालिका प्रशासनाचे कर्मचारी आहेत. त्यांची काळजी घेणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर परिवहन विभागाच्या चालक-वाहकांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
