खासगी वाहनांवरील बनावट ओळखीविरोधात राज्यभर धडक मोहीम
जयेश खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
मुख्यमंत्री कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनंतर पोलीस महासंचालकांचे सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश
नियमभंग करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार थेट कारवाई
पुणे : खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी लावून सरकारी यंत्रणेचा धाक दाखविणाऱ्या आणि त्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. राज्यभर अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत हे परिपत्रक जारी करण्यात आले असून, यामुळे बनावट ओळख वापरणाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयाच्या परिपत्रकानुसार, अनेक पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा इतर व्यक्ती आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल पाटी लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांची तपासणी नाक्यांवर अनेकदा तपासणी टाळली जाते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक आणि अवैध व्यवसाय करणारे बनावट ‘पोलीस’ पाट्या लावून बेकायदेशीर कृत्ये करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे पोहोचल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खासगी वाहनांवर अनधिकृतपणे ‘पोलीस’ची लाल पाटी लावल्याचे आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १२२(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, वाहनांवरील अशा अनधिकृत पाट्या केवळ नियमभंग नसून त्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची प्रतिमा मलिन करतात. तसेच तपासणी प्रक्रियेत अडथळे निर्माण करून गुन्हेगारांना अभय मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यापुढे अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात यापूर्वीही वाहनांवर ‘सरकार’, ‘प्रेस’, ‘ऑन ड्युटी’, ‘अध्यक्ष’, ‘शासकीय’ अशा अनधिकृत पाट्या किंवा चिन्हांचा गैरवापर करून नियम धाब्यावर बसविण्याचे प्रकार समोर आले आहेत. आता ‘पोलीस’च्या लाल पाटीविरोधातील मोहिमेमुळे अशा सर्व प्रकारांवरही पोलीस विभागाची अधिक बारीक नजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस ओळखीचा गैरवापर करून कायद्याला चकवा देणाऱ्यांवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही या कारवाईचे स्वागत होत आहे. वाहनांवर अनधिकृत ओळख दर्शविणाऱ्या पाट्या लावण्याऐवजी कायद्याचे पालन करण्याचा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
