श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नेरूळच्या मराठी शिकवणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
५६८ चालकांनी घेतला प्रवेश, ४३८ जण उत्तीर्ण
नवी मुंबई : प्रवाशांशी संवाद साधताना ‘नमस्कार’, ‘कुठे जायचे आहे?’, ‘किती भाडे झाले?’, ‘ऑनलाइन देणार की कॅश?’… एवढेच नव्हे तर ‘दादा’, ‘मामा’, ‘काका’, ‘ताई’, ‘मावशी’ अशा आपुलकीच्या मराठी संबोधनांचा वापर करण्याचे धडे घेत नेरूळमधील तब्बल ४३८ परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी संवादाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला नेरूळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
१ मेपासून सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाला. नवी मुंबई आरटीओच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना केवळ मराठी भाषा शिकविण्यावर भर न देता, व्यवसायाच्या ठिकाणी प्रवाशांशी सहज आणि आपुलकीने मराठीत संवाद कसा साधायचा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
नेरूळ सेक्टर ६ परिसरातील कंत दर्शन दरबार येथे अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून या अभियानाचे वर्ग घेण्यात आले. या उपक्रमासाठी तब्बल ५६८ परप्रांतीय चालकांनी प्रवेश घेतला, तर त्यापैकी ४३८ चालकांनी प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेत यश मिळविले. उत्तीर्ण चालकांना लवकरच महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
‘मराठी बोला, प्रवाशांशी नाते जोडा’
दर महिन्याला गुरुवारी दुपारी २ ते ५ या वेळेत चालकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत होते. दिलीप आमले आणि पालिका शाळेतील शिक्षक डॉ. अमृत पाटील यांनी चालकांना दैनंदिन व्यवहारातील सोप्या मराठी शब्दांचा आणि वाक्यांचा सराव करून घेतला. रिक्षा किंवा टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाला ‘कुठे जायचे आहे?’ असे मराठीत विचारणे, भाडे सांगणे, ऑनलाइन अथवा रोख पैसे घेण्याबाबत संवाद साधणे, प्रवाशाला योग्य ठिकाणी उतरवणे, तसेच आपुलकीने ‘दादा’, ‘मामा’, ‘काका’, ‘ताई’, ‘मावशी’ अशी संबोधने करणे, यासारख्या प्रत्यक्ष व्यवहारातील प्रसंगांवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.
यामुळे मराठी भाषा शिकण्याबरोबरच चालकांमध्ये प्रवाशांशी संवाद साधण्याचा आत्मविश्वासही निर्माण झाला.
आरटीओ अधिकाऱ्यांकडून परीक्षा
प्रशिक्षणानंतर या चालकांची परीक्षा नवी मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगुळकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे तसेच मोटार वाहन निरीक्षक धनराज शिंदे, सुधीर क्षिरसागर आणि चेतन देवरे यांनी घेतली.
मराठी शिकवणी अभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्राथमिक आणि व्यवहार्य ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, भाषा शिकविताना केवळ पाठांतर न करता रिक्षा-टॅक्सी व्यवसायातील प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली.
अनेक संस्थांचे सहकार्य
या अभियानाला कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य परिषद, नवी मुंबई आरटीओ तसेच दिघा येथील छत्रपती शाहू महाराज शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया राऊत यांचे सहकार्य लाभले. अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूलच्या संचालिका संगीता आमले आणि प्रशिक्षिका संगीता दाते यांनी अभियानाचे नियोजन, संचालन आणि समन्वयाची जबाबदारी सांभाळली.
भाषेच्या माध्यमातून आपलेपणाचा सेतू
नवी मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात विविध राज्यांतून आलेले नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. रिक्षा-टॅक्सी चालकांचा नागरिकांशी दररोज थेट संपर्क येतो. अशा परिस्थितीत प्रवासी आणि चालक यांच्यातील संवादासाठी मराठी भाषेचे
प्राथमिक ज्ञान महत्त्वाचे ठरते.
मराठी शिकणे म्हणजे केवळ भाषा शिकणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि स्थानिक नागरिकांशी संवादाचा एक नवा सेतू निर्माण करणे आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. नेरूळमधील ४३८ चालकांचे यश हे भाषिक समन्वय आणि सामाजिक सलोख्याचेही उदाहरण ठरले आहे.



