वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
माजी नगरसेवक रतन मांडवे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-८ येथील छत्रपती शाहू महाराज उद्यानातील हिरवळ आणि पर्यावरणीय संतुलनाचे संरक्षण करावे, तसेच उद्यानाखाली प्रस्तावित करण्यात येत असलेले भूमिगत पार्किंग रद्द करावे, अशी मागणी नवी मुंबई महापालिकेचे माजी पक्षप्रतोद तथा नगरसेवक रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. पार्किंगची गरज भागविण्यासाठी सारसोळे बस डेपोची जागा तसेच सेक्टर-८ मधील मूळ विकास आराखड्यातील आरक्षित पार्किंग भूखंडाचा पर्याय म्हणून विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
मांडवे यांनी ३१ जुलै २०२६ रोजी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नेरुळ सेक्टर-८ मधील छत्रपती शाहू महाराज उद्यान हे हायटेंशन टॉवरखाली विकसित करण्यात आले असून, नेरुळ पश्चिम भागातील मोठ्या उद्यानांपैकी एक आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने या उद्यानाचे विशेष महत्त्व आहे. मोठ्या प्रमाणातील हिरवळ नागरिकांना मोकळी आणि आरोग्यदायी जागा उपलब्ध करून देते.
मात्र, उद्यानातील हिरवळीवर सातत्याने काँक्रीटीकरणाचा दबाव वाढत असल्याचा आरोप मांडवे यांनी केला आहे. आता उद्यानाखाली भूमिगत पार्किंग उभारण्याचा विचार झाल्यास या कामासाठी उद्यानातील जुन्या व मोठ्या झाडांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यानाची हिरवळ कमी होण्याबरोबरच पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
डीपी प्लॅनमध्ये पार्किंगसाठी स्वतंत्र भूखंड
नेरुळ सेक्टर-८ च्या मूळ विकास आराखड्यात पार्किंगसाठी स्वतंत्र भूखंड राखीव असल्याकडे मांडवे यांनी लक्ष वेधले आहे. पार्किंगसाठी उपलब्ध असलेली आरक्षित जागा असताना नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या उद्यानाखाली पार्किंग उभारणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सारसोळे बस डेपोचा पर्याय सुचविला
परिसरातील पार्किंगची वाढती गरज लक्षात घेता सारसोळे बस डेपोची जागा पर्याय म्हणून वापरता येऊ शकते, अशी सूचना मांडवे यांनी केली आहे. या ठिकाणी भूमिगत पार्किंगसह वरच्या स्तरावर मल्टी-लेव्हल पार्किंगची सुविधा उभारण्याचा विचार करता येईल. त्यामुळे उद्यानाची हिरवळ आणि झाडे सुरक्षित ठेवून पार्किंगची गरजही पूर्ण करता येईल, असा त्यांचा दावा आहे.
महापालिकेच्या खर्चाचा अपव्यय टाळण्याची मागणी
उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी, पदपथ, बालकांसाठी खेळणी आणि हिरवळ विकसित करण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे. अशा परिस्थितीत उद्यानाखाली भूमिगत पार्किंग उभारल्यास यापूर्वी झालेल्या विकासकामांवर परिणाम होऊन महापालिकेचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय टाळावा, अशी मागणी मांडवे यांनी केली आहे.
पुनर्विकासामुळे भविष्यात पार्किंगचा ताण कमी होण्याची शक्यता
नवी मुंबईच्या पश्चिम भागात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. पुनर्विकासाच्या प्रकल्पांमध्ये रहिवाशांसाठी आवश्यक इन-हाऊस पार्किंगची व्यवस्था केली जात असल्याने भविष्यात रस्त्यावरील पार्किंगवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असल्याचेही मांडवे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे उद्यानाच्या हिरवळीचा ऱ्हास न करता पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी सेक्टर-८ मधील आरक्षित पार्किंग भूखंड आणि सारसोळे बस डेपो या पर्यायांचा गांभीर्याने विचार करावा. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले छत्रपती शाहू महाराज उद्यान कायम हिरवेगार ठेवावे, अशी मागणी रतन मांडवे यांनी केली आहे.


