जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmsil.com
पिंपळवंडीत नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
२५ वर्षीय पांग्या उर्फ साहिल खैरेला अटक
न्यायालयाकडून १३ दिवसांची पोलीस कोठडी
जुन्नर : नऊ वर्षांच्या चिमुकलीच्या अत्याचारानंतर झालेल्या हत्येने जुन्नर तालुका हादरला आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांनी रात्रंदिवस मोहीम राबवली. मात्र, याच शोधमोहिमेत सहभागी होत आरोपीने पोलिसांची आणि ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे अखेर या अमानुष गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. पांग्या उर्फ साहिल खैरे (वय २५) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आळेफाटा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या फुटेजमध्ये सायकलवरून जाणारी एक व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आली. त्याबाबत विचारणा केली असता संबंधित तरुणाने “हा तर मीच आहे,” असे सांगितले. मात्र, तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतशा त्याच्या हालचाली पोलिसांना खटकू लागल्या.
शोधमोहिमेतही आरोपीचा वावर!
चिमुकलीचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांसह शेकडो ग्रामस्थ परिसर पिंजून काढत होते. या शोधमोहिमेत साहिल खैरेही सहभागी झाला होता. तो विविध ठिकाणी मुलीचा शोध घेण्याच्या सूचना देत असल्याचे समोर आले. मात्र, एका बाजूला मुलीचा शोध घेण्याचे नाटक आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या हालचालींमधील संशयास्पद बाबी यामुळे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले.
अनुभवी पोलिसांच्या नजरेतून त्याची अस्वस्थता आणि विसंगत माहिती सुटली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक पुरावे तपासण्यास सुरुवात केली. आरोपीने सांगितलेली माहिती आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांमध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
ओढ्याजवळ मृतदेह सापडताच तपासाला वेग
दरम्यान, रात्री ओढ्याच्या परिसरात झाडाजवळ चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. हा धक्कादायक प्रकार समोर येताच संपूर्ण पिंपळवंडी गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक माहिती एकत्रित करत पोलिसांनी संशयित साहिल खैरेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्या कथनात वारंवार विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आमिष दाखवून शेतात नेले; अत्याचारानंतर हत्या
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने चिमुकलीला आमिष दाखवून उसाच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमागील प्रत्येक बाब तपासून काढण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
१३ दिवस पोलीस कोठडी; कठोर शिक्षेची मागणी
आळेफाटा पोलिसांनी साहिल खैरेला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला आरोपीकडून अधिक माहिती मिळवून गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
या घटनेने जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला कायद्यातील तरतुदींनुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि नागरिकांकडून होत आहे.
चिमुकलीचा शोध सुरू असताना तिच्याच शोधमोहिमेत सहभागी होऊन आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची बाब या प्रकरणाला अधिक गंभीर व धक्कादायक वळण देणारी ठरली आहे. मात्र, तांत्रिक पुरावे आणि पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे अखेर गुन्ह्याचा छडा लागला. आता या प्रकरणात जलद तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणे आणि पीडितेला न्याय मिळवून देणे, हे तपास यंत्रणेसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.