श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
एकनाथ शिंदेंच्या निर्देशानंतर महापालिका ॲक्शन मोडवर
रस्त्यांची विभागनिहाय पाहणी, खड्ड्यांचे जिओ टॅगिंग
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दणका दिला आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले असून शहरातील सर्व रस्त्यांची विभागनिहाय पाहणी सुरू करण्यात येत आहे.
पालकमंत्री शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत शहरांमधील रस्त्यांची दुरवस्था आणि गणेशोत्सव काळातील नागरिकांच्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासोबतच गणेशोत्सवापूर्वी रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत आणण्याचे निर्देश सर्व महानगरपालिकांना देण्यात आले.
‘रोड पेट्रोलिंग’ने खड्ड्यांवर नजर
पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभियांत्रिकी विभागाला तातडीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी विभागनिहाय पथके तयार करण्यात येत असून ‘रोड पेट्रोलिंग’ संकल्पनेद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांची नियमित पाहणी केली जाणार आहे.
प्रत्येक खड्ड्याचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असून त्यामुळे कोणत्या ठिकाणी किती खड्डे आहेत, त्यांची दुरुस्ती झाली की नाही आणि कोणत्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत, यावर प्रशासनाला लक्ष ठेवता येणार आहे.
खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान
यावेळी केवळ पारंपरिक पद्धतीने खड्डे बुजविण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सामान्य स्वरूपाचे खड्डे मास्टिक जिओपॉलिमरच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. तर मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या ठिकाणी एम-60 काँक्रीट विथ हार्डनर तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यामुळे पावसाळ्यात वारंवार खड्डे पडण्याची समस्या कमी होऊन रस्ते अधिक टिकाऊ करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
‘त्या’ रस्त्यांचीही दुरुस्ती महापालिकेने करावी!
नवी मुंबईतील सर्वच रस्ते महापालिकेच्या अखत्यारित नाहीत. काही रस्ते पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी आणि एनएचएआय यांसारख्या प्राधिकरणांच्या अखत्यारित आहेत. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यास महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे अशा रस्त्यांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च संबंधित प्राधिकरणांकडून वसूल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘हा रस्ता आमच्या अखत्यारित नाही’ असे सांगून जबाबदारी झटकण्याची प्रशासनाची भूमिका यावेळी चालणार नाही.
गणेशोत्सवापूर्वी रस्ते चकाचक करण्याचे आव्हान
गणेशोत्सवात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. गणेशमूर्तींची ने-आण, मिरवणुका, विसर्जन आणि नागरिकांची मोठी गर्दी यामुळे रस्त्यांवरील खड्डे अपघाताला निमंत्रण ठरू शकतात. त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
शहर अभियंता, दोन्ही परिमंडळांचे उपआयुक्त, कार्यकारी अभियंता आणि विभाग अधिकारी यांना आपापल्या कार्यक्षेत्रात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी क्षेत्रीय पाहणी करून कामांचा आढावा घेण्याचेही निर्देश आहेत.
आता नागरिकांचे लक्ष कामाच्या गुणवत्तेकडे
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट निर्देशांनंतर महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी खड्डे बुजविण्यापेक्षा ते पुन्हा पडणार नाहीत, याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. आता प्रत्यक्षात किती रस्ते दुरुस्त होतात आणि कामाची गुणवत्ता किती टिकते, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


