अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
युवा सेनेचे निखिल मांडवे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मूलभूत सुविधांसाठी आक्रमक मागणी
नवी मुंबई : नेरूळ पश्चिम परिसरातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता, नेरूळ सेक्टर-८ मध्ये अत्याधुनिक भव्य ग्रंथालय तसेच ५० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना स्वतंत्र निवेदने सादर केली असून, दोन्ही प्रकल्पांना महापालिकेने प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
नेरूळ सेक्टर-८ मधील प्लॉट क्रमांक १२ वर महापालिकेचे कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्र असून, येथे सध्या ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू आहे. नेरूळ सेक्टर ६, ८, १०, कुकशेत गाव, सारसोळे गाव तसेच जुईनगर परिसरातील विद्यार्थी अभ्यासासाठी या ठिकाणी येतात. महिलांसह ज्येष्ठ नागरिकही ग्रंथालयाचा वापर करतात. मात्र, सुमारे तीन दशकांपूर्वी उभारण्यात आलेली ही इमारत आता वाढत्या गरजांच्या तुलनेत अपुरी पडत असल्याचे मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना उपलब्ध अभ्यासिकेची जागा कमी पडत आहे. त्यामुळे विद्यमान इमारत पाडून त्याच ठिकाणी तळमजल्यासह चार ते पाच मजली अत्याधुनिक ग्रंथालय व प्रशस्त अभ्यासिका उभारण्यात यावी. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका, अद्ययावत ग्रंथसंग्रह, डिजिटल सुविधा आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नेरूळ सेक्टर-८ मधील नागरी आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असलेल्या प्लॉट क्रमांक २-एवर केवळ नागरी आरोग्य केंद्राऐवजी ५० बेडचे सुसज्ज महापालिका रुग्णालय उभारण्याची मागणीही मांडवे यांनी केली आहे.
नेरूळ पश्चिम परिसरात सिडकोच्या इमारतींच्या पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. सध्या नेरूळ पश्चिमेकडे कुकशेत आणि नेरूळ गावात नागरी आरोग्य केंद्रे आहेत; मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र महापालिका रुग्णालयाची सुविधा उपलब्ध नाही. नेरूळ पूर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळ मीनाताई ठाकरे माताबाल रुग्णालय असले तरी नेरूळ पश्चिमेकडील नागरिकांना ते तुलनेने दूर पडते. त्यामुळे सेक्टर-८ मधील आरक्षित भूखंडावर ५० बेडचे रुग्णालय उभारल्यास नेरूळ पश्चिमेकडील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असा दावा मांडवे यांनी केला आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, डायलिसिस सेंटर, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ तसेच इतर आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सध्या अनेक नागरिकांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, त्यासाठी मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागतो. त्यामुळे नेरूळ पश्चिम परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या भूखंडावर तातडीने रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे मांडवे यांनी स्पष्ट केले.
वाढती लोकसंख्या, वाढत्या शैक्षणिक गरजा आणि आरोग्य सुविधांची कमतरता लक्षात घेता नेरूळ पश्चिमेला आता केवळ आश्वासन नव्हे, तर ठोस पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. त्यामुळे ग्रंथालयाच्या पुनर्बांधणीसह ५० बेडच्या रुग्णालयाचा प्रस्ताव महापालिकेने गांभीर्याने घेऊन दोन्ही कामांचा लवकरात लवकर शुभारंभ करावा, अशी मागणी मांडवे यांनी केली आहे.
