श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
वाढत्या औद्योगिक व निवासी वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
विशेष कोम्बिंग ऑपरेशनचीही मागणी
नवी मुंबई : तळोजा एमआयडीसी फेज-१ आणि फेज-२ परिसराचा झपाट्याने विस्तार होत असताना या भागाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक आस्थापने, कामगारवर्ग, विद्यार्थी आणि निवासी वसाहतींच्या पार्श्वभूमीवर तळोजा एमआयडीसीसाठी केवळ पोलीस चौकी पुरेशी नसून कायमस्वरूपी, पूर्ण क्षमतेने आणि २४ तास कार्यरत असलेले स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी होत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचा तातडीने प्रतिसाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. घटनास्थळी पोहोचण्यास होणारा विलंब अनेकदा किरकोळ घटना गंभीर स्वरूप धारण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे तळोजा एमआयडीसी परिसरात चोवीस तास पोलिसांची उपलब्धता आणि जलद प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अमली पदार्थांविरोधातील कारवाईला बळ देण्याची मागणी
नवी मुंबई, रायगड आणि पनवेल परिसरात अमली पदार्थांविरोधात मोहीम सुरू असताना तळोज्यासारख्या संवेदनशील औद्योगिक परिसरात पोलिसांची स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. स्वतंत्र पोलीस ठाण्यामुळे अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी अधिक प्रभावीपणे कारवाई करता येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
तलवार घेऊन फिरण्याचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, खुटारी परिसरात एका व्यक्तीच्या हातात नग्न तलवार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या व्हिडिओची पोलिसांनी तातडीने सत्यता पडताळावी, संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तळोज्यात विशेष कोम्बिंग ऑपरेशनची मागणी
तळोजा परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामध्ये तडीपार तसेच हद्दपार व्यक्तींची तपासणी, बेकायदा शस्त्रांचा शोध व जप्ती, संशयित टोळ्यांवर नजर, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे निरीक्षण आणि रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवून संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
‘तळोज्याच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे द्या’
तळोजा एमआयडीसी फेज-१ आणि फेज-२ साठी कायमस्वरूपी, पूर्ण क्षमतेने आणि २४ तास कार्यरत स्वतंत्र पोलीस ठाणे तातडीने सुरू करावे, अशी स्पष्ट मागणी ऑल इंडिया उलमा बोर्डच्या रायगड-कोकण विभागाचे तळोजा युनिटचे हाजी शहनवाज खान यांनी केली आहे.
तळोज्याची सुरक्षितता हा केवळ पोलीस ठाण्याचा विषय नसून येथील नागरिक, कामगार, विद्यार्थी, कुटुंबे आणि व्यापारी वर्गाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे. जलद पोलिस प्रतिसाद, प्रभावी गुन्हे नियंत्रण आणि सुरक्षित तळोजा यासाठी सक्षम पोलीस यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

