श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
कंत्राटी कामगारांचा मंजूर विशेष संचालन भत्ता दोन महिन्यांपासून प्रलंबित; तातडीने अंमलबजावणीची मागणी
७,५०० भत्त्यासाठी नितीन चव्हाणांचा एल्गार; महापालिकेला उपोषणाचा इशारा
दोन महिने भत्ता रखडला,
मंजूर ठरावाची अंमलबजावणी करा,
७,५०० भत्ता द्या, अन्यथा उपोषण! नितीन चव्हाणांचा इशारा
नवी मुंबई : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला कंत्राटी कामगारांचा ७,५०० विशेष संचालन भत्ता गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंजूर ठरावाची तातडीने अंमलबजावणी करून कामगारांना भत्त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
या प्रलंबित प्रश्नाबाबत नितीन चव्हाण यांनी नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन उपायुक्त पालांडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी अद्याप का झाली नाही, याबाबत त्यांनी प्रशासनाकडे विचारणा केली.
“सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर होऊनही दोन महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काच्या ₹७,५०० विशेष संचालन भत्त्यापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. मंजूर ठरावाची तातडीने अंमलबजावणी करून कामगारांना त्यांच्या हक्काचा लाभ द्यावा,” अशी स्पष्ट भूमिका नितीन चव्हाण यांनी मांडली.
कामगारांच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करत “कामगारांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशाराही चव्हाण यांनी दिला. कंत्राटी कामगारांच्या मंजूर हक्काचा लाभ विलंब न करता मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रश्न न सुटल्यास उपायुक्तांच्या दालनात उपोषण
₹७,५०० विशेष संचालन भत्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास उपायुक्त पालांडे यांच्या दालनात उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नितीन चव्हाण यांनी यावेळी दिला. त्यामुळे प्रलंबित भत्त्याच्या प्रश्नावर प्रशासन आता काय निर्णय घेते, याकडे कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे.
कामगार प्रतिनिधींची उपस्थिती
या बैठकीस राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, नवी मुंबईचे अध्यक्ष संजय सुतार, उपाध्यक्ष अजय सुपेकर, उपाध्यक्ष संदीप मोहिते, सरचिटणीस राम पुजारी यांच्यासह विविध कामगार प्रतिनिधी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते.