श्रमिक शिक्षण मंडळातर्फे शिक्षक दिनी शिक्षकांचा गुणगौरव
नवी मुंबई : “काळ बदलत असताना शिक्षकांनीही स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवून आधुनिक युगाशी जोडले गेले पाहिजे. केवळ आजच्या गरजा पूर्ण करणारे नव्हे, तर पुढील अनेक पिढ्यांना सक्षम करणारे शिक्षण देणे ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांनी केले.
श्रमिक शिक्षण मंडळातर्फे शिक्षक दिनानिमित्त कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संदीप नाईक यांच्या हस्ते शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेतील शिक्षकांशी संवाद साधताना शिक्षण क्षेत्रासमोरील बदलती आव्हाने आणि भविष्यातील संधी यावर आपले विचार मांडले.
संदीप नाईक म्हणाले की, आजचा शिक्षक काळाच्या ओघात टप्प्याटप्प्याने स्वतःला आधुनिक युगाशी जोडताना दिसत आहे. ही प्रक्रिया एका दिवसात घडलेली नसून त्यामागे अनेक दशकांची साधना आहे. श्रमिक शिक्षण मंडळाने गेल्या 40 वर्षांत विविध क्षेत्रांत केलेली प्रगती निश्चितच उल्लेखनीय आहे. मात्र, भविष्यातील विकासासाठी यापेक्षा दुप्पट वेगाने आणि सातत्याने काम करण्याची गरज आहे. “काम करत राहणे आणि काळासोबत चालत राहणे हेच आपल्या धोरणाचे आणि विचारांचे सूत्र असले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावाकडे लक्ष वेधताना नाईक यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. इतर राष्ट्रांबरोबर आपली पिढी, समाज आणि राज्य टिकवायचे असेल तर आपल्या कामाचा वेग वाढवावा लागेल. अन्यथा आपल्या घराजवळील, देशातील आणि जगातील उपलब्ध संधी इतरांकडून हिरावल्या जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
“आज आपण विद्यार्थ्यांना जे शिक्षण देतो ते केवळ उद्यासाठी नसून युगांसाठी सक्षम करणारे असले पाहिजे,” अशी अपेक्षा संदीप नाईक यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर संस्थेतील शिक्षकांनी विज्ञान, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेला नावलौकिक सातत्याने टिकवण्यासाठी इतर शैक्षणिक संस्था आणि राज्यातील शिक्षकांशी विचारांचे आदानप्रदान वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी कार्यशाळा, प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण बदलत्या शिक्षणविश्वासोबत किती पुढे आहोत, याची सातत्याने चाचपणी करावी, असेही त्यांनी सूचित केले.
श्रमिक शिक्षण मंडळाची शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा गेल्या 41 वर्षांपासून सुरू आहे. संस्थेची स्थापना राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी केल्यापासून ही परंपरा जपली जात आहे. संस्थेच्या अध्यक्षांकडून होणारा हा सन्मान शिक्षकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमात श्रेयस सुतार (मराठी माध्यम) आणि वैष्णवी जाधव (इंग्रजी माध्यम) यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले विचार व्यक्त करून आदर्श शिक्षकांना वंदन केले. राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रणिती जगदाळे हिचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला श्रमिक शिक्षण मंडळाच्या शिक्षण संचालिका सौ. अमिता भट, एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, मुख्याध्यापक रविंद्र पाटील, मुख्याध्यापिका सीमा म्हात्रे, राजश्री यादव, सुमती सुप्रिया, इलियन फर्नांडिस आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. संस्थेतील शिक्षक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे छायाचित्र असलेली ‘कौटुंबिक वॉल’ हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जाधव यांनी केले.