स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
घणसोली–खारकोपर मार्गावरील प्रवाशांच्या संतापाला वाचा
नगरसेवक अभिजीत देसाई यांचा परिवहन प्रशासनाला इशारा
बस वेळेवर नाही, ॲपमध्ये लोकेशन नाही
एनएमएमएटीच्या कारभारावर मनसेचा हल्लाबोल!
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या घणसोली आगार ते खारकोपर मार्ग क्रमांक १८ वरील ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसच्या वेळांचे कोणतेही ठोस नियोजन नसल्याने गाड्या वेळेवर येत नाहीत, तर इलेक्ट्रिक बसमधील तांत्रिक बिघाडांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
विशेषतः इलेक्ट्रिक बस प्रवासात असतानाच अचानक चार्जिंग संपणे, बस अर्ध्या मार्गातूनच माघारी आगारात न्यावी लागणे आणि त्यानंतर प्रवाशांना वाऱ्यावर सोडले जाणे, हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “प्रवाशांनी तिकीटाचे पैसे मोजायचे आणि बदल्यात अनिश्चित प्रवास व मनस्ताप सहन करायचा, हे खपवून घेतले जाणार नाही,” अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
याशिवाय एनएमएमटीच्या परिवहन ॲपवर बसची अचूक वेळ आणि सद्य:स्थितीतील लोकेशन योग्यरीत्या दिसत नसल्याने प्रवाशांची आणखी गैरसोय होत आहे. १५ ऑगस्टपासून नवीन ॲप सुरू करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक जंगले यांनी दिले होते; मात्र अद्याप त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, घणसोली आगारातील उपाहारगृह गेल्या अनेक वर्षांपासून बंद असून, प्रवाशांच्या सोयीसाठी मागणी करण्यात आलेल्या नवीन बस स्टॉपचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडला आहे. त्यामुळे प्रशासन नेमके कोणाच्या सोयीसाठी काम करत आहे, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
या सर्व गंभीर प्रश्नांवर आता मनसेने थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नगरसेवक श्री. अभिजीत अनंत देसाई यांनी काल नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या मुख्य परिवहन व्यवस्थापकांची त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी प्रवाशांच्या विविध मागण्या आक्रमकपणे मांडत परिवहन प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
“प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नका. बससेवा वेळेवर करा, इलेक्ट्रिक बसचे तांत्रिक प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, परिवहन ॲप कार्यक्षम करा, बंद उपाहारगृह सुरू करा आणि प्रलंबित बस स्टॉपची मागणी तातडीने पूर्ण करा,” अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.
विशेष म्हणजे, येत्या आठवड्यात या सर्व त्रुटी दूर करून प्रवाशांच्या रास्त मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा नगरसेवक अभिजीत देसाई यांनी परिवहन प्रशासनाला दिला.
कोट
आता प्रशासन या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन प्रवाशांच्या समस्या सोडवते की मनसेला आंदोलनाच्या मैदानात उतरावे लागते, याकडे घणसोली–खारकोपर मार्गावरील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
— अभिजीत अनंत देसाई
नगरसेवक, प्रभाग क्रमांक २२ (ड)
नवी मुंबई महापालिका



