स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
गणेशभक्तांच्या सेवेला निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची हेळसांड
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने धावून करताच पाण्याची तातडीची व्यवस्था
चालकांना विश्रांती नाही, पाणी नाही, शौचालयांची अपुरी व्यवस्था;
उद्या प्रवाशांच्या सुरक्षेचे काय?” — नितीन चव्हाणांचा संतप्त सवाल
नवी मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष एसटी बससेवेचा मोठा गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात या विशेष बससेवेमागील शासकीय नियोजनाचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा फज्जा उडाल्याचे धक्कादायक चित्र पनवेलमध्ये समोर आले आहे. नवी मुंबई विमानतळालगतच्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावर पश्चिम महाराष्ट्र, बीड, परभणी, नाशिक आदी जिल्ह्यांतून आलेल्या तब्बल २५० एसटी बसेस थांबवण्यात आल्या आहेत. या बसेससह आलेल्या ४५० हून अधिक चालक आणि वाहकांना मात्र मूलभूत सुविधांसाठीही प्रशासनाच्या उदासीनतेचा सामना करावा लागत आहे.
या ठिकाणी थांबलेल्या एसटी चालक-वाहकांसाठी पिण्याचे पाणी, अन्न, प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर पुरेसे दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी आणि जेवणाचीही वेळेवर व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने गणेशभक्तांना त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी असलेले चालक-वाहकच गैरसोयीच्या परिस्थितीत रात्र काढत आहेत. त्याहून संतापजनक बाब म्हणजे ४५० हून अधिक चालक-वाहकांसाठी केवळ पाच कंटेनर शौचालयांची व्यवस्था करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील कर्मचाऱ्यांसाठी ही व्यवस्था अत्यंत अपुरी असल्याने प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात दिवसरात्र वाहन चालविणाऱ्या चालकांना पुरेशी झोप आणि विश्रांती मिळणे अत्यावश्यक असताना, त्यांनाच रात्री व्यवस्थित झोपता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्या हजारो प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होणाऱ्या चालकांच्या सुरक्षिततेचा आणि पर्यायाने प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्रशासन झोपले; राष्ट्रवादी युवक काँग्रेस धावली!
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत एसटी चालक-वाहकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
प्रशासनाकडून पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नितीन चव्हाण यांच्या पुढाकाराने चालक-वाहकांसाठी तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचाऱ्यांसाठी पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्याचे नियोजनही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आले.
एकीकडे प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव असताना दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रत्यक्ष घटनास्थळी उतरून एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याने नितीन चव्हाण यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
नितीन चव्हाणांचा सरकारवर घणाघात
यावेळी बोलताना नितीन चव्हाण यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
“शासन केवळ सोशल मीडियावर जाहिराती आणि फलकबाजी करण्यात व्यस्त आहे. गणेशोत्सवात आम्ही मोफत आणि विशेष सेवा देत आहोत, असा खोटा आव आणला जात आहे. मात्र प्रत्यक्षात गणेशभक्तांची सेवा करणाऱ्या एसटी चालक-वाहकांची अवस्था काय आहे, हे पाहण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही,” असा घणाघात चव्हाण यांनी केला.
“२५० बसेस आणि त्यामधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी या चालक-वाहकांवर आहे. मात्र त्यांनाच पिण्याचे पाणी नाही, पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत, प्रकाशव्यवस्था नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी विश्रांती मिळत नाही. चालकांची झोप पूर्ण झाली नसेल तर ते हजारो प्रवाशांना घेऊन सुरक्षित वाहन कसे चालवणार?” असा संतप्त सवाल नितीन चव्हाण यांनी उपस्थित केला.
“उद्या अपुऱ्या विश्रांतीमुळे एखादी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही. चालक-वाहकांची झालेली ही हेळसांड अत्यंत लज्जास्पद असून, या नियोजनातील निष्काळजीपणाची संपूर्ण जबाबदारी सरकार आणि प्रशासनाचीच आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
प्रसिद्धीच्या फलकांपेक्षा कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा द्या!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष एसटी बससेवेची जाहिरातबाजी करण्यापेक्षा या सेवा सुरळीतपणे चालविणाऱ्या चालक-वाहकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नितीन चव्हाण यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत सेवा देण्यासाठी चालकांना पुरेशी विश्रांती, स्वच्छ पाणी, पौष्टिक अन्न, पुरेशी स्वच्छतागृहे आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. केवळ बस रस्त्यावर उतरवून विशेष सेवा सुरू केली असे म्हणता येणार नाही; त्या सेवेमागील मनुष्यबळाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतली.
नियोजनाचा खरा चेहरा उघड
या संपूर्ण प्रकारामुळे “गणेशोत्सव विशेष एसटी सेवा”च्या नियोजनाचा खरा चेहरा समोर आला असून, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे पदाधिकारी प्रशांत तडाखे, अजय सुपेकर, संदीप मोहिते, तुषार कचरे, विश्वजीत भोईटे, केतन वालकर, अजय वीर, वैभव जाधव, स्वप्निल गाडगे, प्रशांत सोळसकर आणि राम पुजारे आदी उपस्थित होते.
गणेशभक्तांना सुरक्षित प्रवास देण्याची जबाबदारी असलेल्या एसटी चालक-वाहकांचीच जर अशी हेळसांड होत असेल, तर सरकारच्या “विशेष सेवा”च्या दाव्यांचे काय? हा सवाल आता प्रशासनासमोर उभा ठाकला असून, या प्रश्नावर नितीन चव्हाण आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढील काळात आणखी आक्रमक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.