महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा नवी मुंबई महापालिका प्रशासनाला इशारा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल ७ हजार ५०० रुपयांची वाढ केली आहे. मात्र, महापालिकेच्या परिवहन विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी संवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केला आहे. हा दुजाभाव तातडीने दूर करून सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनात किमान ७ हजार रुपयांची वाढ लागू करावी, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने संघटनेचे सचिव मंगेश गायकवाड आणि परिवहन विभागातील कंत्राटी कामगारांचे युनिट अध्यक्ष जितेश तांडेल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन साद केले.
तसेच संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, महापौर सुजाता पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, महापालिकेतील शिवसेना गटनेते मनोज हळदणकर आणि परिवहन सभापती यांनाही निवेदने देण्यात आली आहेत. परिवहन विभागातील कंत्राटी संवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढीचा लाभ तातडीने देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात ७ हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल परिवहन विभागाचे सभापती, सदस्य, व्यवस्थापक आणि कॅफो यांचे महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने आभार मानण्यात आले.
मात्र, वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा आणि भावनांचा विचार करून इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली असताना परिवहन विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात आल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ७ हजार ५०० रुपयांची वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला होता. या वेतनवाढीचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय घटकांनीही प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ऐरोलीचे आमदार, राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात येईल, असे जाहीर केले होते.
महापालिका सभागृहाच्या सर्वसाधारण सभेत महापौर, सभागृहनेते आणि नगरसेवकांनी वेतनवाढीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला असतानाही परिवहन विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ का देण्यात आला नाही, असा सवाल महाराष्ट्र कर्मचारी युनियनने उपस्थित केला आहे.
समान काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनाच्या बाबतीत भेदभाव केल्याने सफाई कर्मचाऱ्यांवर आर्थिक अन्याय होत असून, या दुजाभावाचा त्यांच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.
त्यामुळे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नवी मुंबई महापालिका परिवहन विभागातील कंत्राटी संवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांनाही तातडीने वेतनवाढ लागू करावी. अन्यथा संघटनेला प्रशासनाविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा रविंद्र सावंत यांनी दिला आहे.