“महाराष्ट्र आहे का तालिबान?”; कायदा-सुव्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मंत्र्यांच्या कुटुंबीयांवरही हल्ले होत असतील, तर सामान्य जनता किती सुरक्षित आहे, असा सवाल करत “गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल झाले असून त्यांनी खुर्ची सोडावी,” अशी मागणी सपकाळ यांनी केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या भाऊ व पुतण्यावर झालेला हल्ला, जळगावातील केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीची घटना आणि राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचा दाखला देत सपकाळ यांनी सरकारला लक्ष्य केले. “महाराष्ट्राचा तालिबान करण्याचे काम सुरू आहे का?” असा सवालही त्यांनी केला.
पुणे पोलिसांवरील मानवी हक्क आयोगाची शिफारस गंभीर
पुणे पोलिसांच्या कारवाईवर राज्य मानवी हक्क आयोगाने घेतलेल्या भूमिकेवरही सपकाळ यांनी सरकारला घेरले. अल्पवयीन आरोपींची कारच्या बॉनेटवरून धिंड काढल्याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस झाल्याचा उल्लेख करत, “हा फडणवीसांच्या गृहमंत्रिपदाच्या कारभारावरील मोठा कलंक आहे,” अशी टीका त्यांनी केली.
‘गोरक्षणा’च्या नावाखाली अमानुष मारहाण
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन व्यक्तींना गोरक्षणाच्या नावाखाली विवस्त्र करून मारहाण व जबरदस्तीने लघवी पाजल्याच्या कथित घटनेवरूनही सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. “हा माणुसकीला काळिमा फासणारा विकृत प्रकार असून दोषींवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर मोक्का लावावा,” अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात गुंडगिरी, ड्रग्ज आणि कथित वसुलीला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा दावा सपकाळ यांनी केला. “ड्रग्ज फ्री महाराष्ट्र”च्या घोषणेपेक्षा त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचेही त्यांनी सुनावले.