अनधिकृत बॅनरच्या उद्रेकावरून प्रशासनाला धारेवर; आयुक्तांकडे संतप्त निवेदन
जुईनगरसह नेरूळ पूर्व-पश्चिम परिसर बॅनरच्या विळख्यात; दररोज कारवाईची मागणी
नवी मुंबई : जुईनगर तसेच नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसरात अनधिकृत बॅनरचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, शहर विद्रूप करणाऱ्या या बॅनरविरोधात महापालिका प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली कारवाई करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडे डोळेझाक करणाऱ्या नेरूळ विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच चौकशी करून, दोष आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी थेट मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
‘कारवाई कुणावर आणि कुणासाठी?’ असा सवाल
नेरूळ विभागाच्या हद्दीत बाराही महिने अनधिकृत बॅनर झळकत असतानाही अतिक्रमण विभागाकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काही निवडक बॅनरवर कारवाई करून मोठ्या प्रमाणातील अनधिकृत बॅनरकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत, ‘महापालिकेच्या कारवाईचे निकष सर्वांसाठी समान आहेत की तोंड पाहून कारवाई केली जाते?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
राजकीय व्यक्ती अथवा राजकीय पक्षांशी संबंधित बॅनरवर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पथदिवेही बॅनरच्या विळख्यात!
अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांचे धाडस एवढे वाढले आहे की, आता महापालिकेच्या पथदिव्यांवरही बॅनर लावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचा अशा प्रकारे वापर होत असतानाही संबंधित विभागांकडून पुरेशी कारवाई होत नसेल तर जबाबदारी निश्चित कोणाची, असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
महापालिकेचे महसुली नुकसान, शहराचे विद्रूपीकरण
अनधिकृत बॅनरमुळे नवी मुंबईच्या सौंदर्याला बाधा येत असून शहराचा बकालपणा वाढत आहे. त्याचबरोबर अधिकृत जाहिरात व्यवस्थेतून मिळू शकणाऱ्या महसुलावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘बॅनर हटवा, नाहीतर जबाबदारी निश्चित करा’
जुईनगर तसेच नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसरात दररोज बॅनरविरोधी धडक मोहीम राबवावी, पथदिव्यांवरील सर्व अनधिकृत बॅनर तातडीने हटवावेत आणि बॅनर लावणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच अनधिकृत बॅनरविरोधात कारवाई करण्यात कसूर, दुर्लक्ष किंवा अन्य प्रकारची जबाबदारी आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही नियमानुसार कठोर प्रशासकीय तसेच आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करावी. या प्रकरणात महापालिकेने नेमकी कोणती कारवाई केली, याचा लेखी अहवालही देण्यात यावा, अशी मागणी खांडगेपाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.
शहर विद्रूप करणाऱ्या अनधिकृत बॅनरला आळा घालण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर त्या निष्क्रियतेचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.