खोपोली-बोरघाट परिसरातील घटना; कंटेनरची टेम्पोला पाठीमागून धडक, बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न
वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
खोपोली : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. खोपोली-बोरघाट परिसरातील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनरने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने दोन्ही वाहने नियंत्रणाबाहेर जाऊन दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत कंटेनर चालकाचा मृत्यू झाला असून, टेम्पो चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
हा अपघात सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास, द्रुतगती मार्गावरील किलोमीटर क्रमांक ३९ जवळ, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडला. प्राथमिक माहितीनुसार कंटेनरने टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीकडे गेली. कंटेनर खोल दरीत कोसळला, तर टेम्पो उतारावरील भागात अडकून राहिला.
कंटेनर चालकाचा मृत्यू
अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नसून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान, टेम्पो चालक मिराज शेख याला बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढले.
अपघाताची माहिती मिळताच विविध बचाव आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत, डेल्टा फोर्स, अफकॉन्स, महाराष्ट्र सुरक्षा दल, लोकमान्य रुग्णालय, १०८ रुग्णवाहिका, हेल्प फाउंडेशन तसेच बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिसांनी बचावकार्य हाती घेतले. दरीत कोसळलेल्या वाहनांपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक असल्याने बचाव पथकांना मोठी कसरत करावी लागली.
वाहतूक सुरळीत
अपघातातील दोन्ही वाहने द्रुतगती मार्गाच्या मुख्य रस्त्यापासून खाली गेल्याने मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सध्या वाहतूक नियंत्रणात असून, अपघातग्रस्त वाहने आणि परिसराची पाहणी करण्यात येत आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
कंटेनरने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असले तरी अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महामार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वेग, वाहनावरील नियंत्रण, चालकाची स्थिती किंवा अन्य कोणता घटक कारणीभूत ठरला का, याबाबत तपासानंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.
सलग अपघातांमुळे एक्स्प्रेसवेच्या सुरक्षिततेचा प्रश्न
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट आणि मिसिंग लिंक परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांमुळे पुन्हा एकदा या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २७ सप्टेंबर रोजीही बोरघाट परिसरात तीन वाहनांच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता आणि एक जण गंभीर जखमी झाला होता. आजच्या अपघातानंतर महामार्गावर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखणे आणि विशेषतः घाट उतारावर अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू असून, मृताची ओळख आणि अन्य तपशील अधिकृतरीत्या स्पष्ट झाल्यानंतर पुढील माहिती समोर येणार आहे.