कामगार नेते रवींद्र सावंत यांची महापौर, आयुक्त, स्थायी समितीसह परिवहन समितीकडे मागणी
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनुदानातही ७,५०० रुपयांची वाढ करण्याची मागणी
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीची दखल घेत आगामी दिवाळी २०२६ निमित्त कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये, तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि महापौर सौ. सुजाता पाटील यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
याबाबत कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका विरोधी पक्षनेते, परिवहन सभापती, परिवहन व्यवस्थापक यांच्याकडे स्वतंत्र निवेदन सादर केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी सातत्याने नागरिकांना सेवा देत आहेत. स्वच्छता, आरोग्य, मालमत्ता कर, विभागीय कार्यालये, परिवहन यांसह विविध विभागांच्या कामगिरीमुळे नवी मुंबईला अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. या कामगिरीमागे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
सानुग्रह अनुदानात भरीव वाढ करण्याची मागणी
वाढती महागाई आणि दिवाळीच्या काळातील वाढता खर्च लक्षात घेता कर्मचाऱ्यांना दिले जाणारे सानुग्रह अनुदान हे त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरते. त्यामुळे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतूद विचारात घेऊन यंदा सानुग्रह अनुदानात भरीव वाढ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच कायम कर्मचारी, ठोक मानधनावरील कर्मचारी, एनयूएचएम कर्मचारी, बाह्य संस्थांमार्फत कार्यरत कर्मचारी, ठोक मानधनावरील शिक्षक, तासिका शिक्षक, प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी तसेच परिवहन विभागातील ठोक मानधन कर्मचारी, चालक-वाहक आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांचाही सानुग्रह अनुदानात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
घोषित केलेली ७,५०० रुपयांची वेतनवाढ दिवाळीपूर्वीच द्या
तसेच पालिका आस्थापनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ७,५०० रुपयांची वाढ करून ही रक्कम दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशीही मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.वर्षभर नागरिकांसाठी सेवा बजावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान वितरित करावे, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली आहे.

